ऑपरेशन सिंदूरमधील पराभवानंतरही पाकिस्तान सुधारण्याचे नाव नाही. आता पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही (१४ ऑगस्ट) पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खूप बढाया मारल्या आहेत. चार दिवसांच्या संघर्षात पाकिस्तानने ऐतिहासिक विजय नोंदवला, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पाकिस्तानी जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात, "पाकिस्तानच्या स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी देशाला मनापासून शुभेच्छा देतो," असे शरीफ यांनी म्हटले आहे.
शाहबाज यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, "मी राष्ट्रपिता मोहम्मद अली जिना आणि अल्लामा मोहम्मद इक्बाल यांना श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेते आणि कार्यकर्त्यांसह देशाला एका ध्येयासाठी एकत्रित केले. त्यांच्या प्रयत्नाने एका स्वतंत्र देशाच्या निर्मितीसह इतिहासाचा प्रवाह बदलला आणि अशक्य वाटणारे स्वप्न साकार केले."
भारतासोबतच्या संघर्षासंदर्भात काय म्हणाले शाहबाज? ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या संघर्षासाठी शाहबाज यांनी पूर्णपणे भारतालाच जबाबदार धरले आहे. बढाया मारताना ते म्हणाले, "भारताने आपल्यावर युद्ध लादले होते. मात्र पाकिस्तानने त्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयाने केवळ आपल्या स्वातंत्र्याचे पावित्र्यच बळकट केले नाही, तर आपल्या लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावनाही जागृत केली आहे. यामुळे या स्वातंत्र्यदिनाचा अभिमान आणि उत्साह आणखी वाढला आहे."
शाहबाज पुढे म्हणाले, "अल्लाहच्या कृपेने, आपल्या शूर सैनिकांनी आपली शान कायम ठेवली आणि शत्रूचा खोटा अभिमान मोडून काढला. आमच्या शूर सैनिकांनी आणि हवाई दलाच्या सैनिकांनी शत्रूला गुडघे टेकण्यास भाग पाडले. आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राण देणाऱ्या शहीदांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो."
ऑपरेशन सिंदूर दरम्यान झाला होता पाकिस्तानचा पराभव -पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे बदला घेतला होता. या कारवाईत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यात शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले होते. यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. यानतंर, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या लष्करी अड्ड्यांवर हल्ले करत प्रत्युत्तरही दिले होते.