PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कॅरिबियन देश त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याचा हा दुसरा टप्पा आहे. आज पीएम मोदींचे राजधानी पोर्ट ऑफ स्पेनमधील पिआर्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. येथे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळातील ३८ मंत्री आणि ४ खासदार उपस्थित होते. पंतप्रधान कमला यांनी स्वतः पारंपारिक भारतीय पोशाख साडी परिधान केली होती. अनेक मंत्री आणि खासदार देखील त्यांच्यासोबत भारतीय पोशाखात दिसले. हे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध दर्शवते.
पंतप्रधान मोदींच्या स्वागत समारंभात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले. तेथील भारतीय समुदायाने तिरंगा ध्वज फडकावून आणि पारंपारिक लोकगीते गाऊन पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. हे सांस्कृतिक सादरीकरण दोन्ही देशांमधील खोल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक होते. पंतप्रधान मोदींच्या येण्याने पोर्ट ऑफ स्पेनमधील भारतीय वंशाच्या लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता.
भाजप नेते अमित मालवीय यांनी याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले की, पंतप्रधान मोदींचे पोर्ट ऑफ स्पेनमध्ये ऐतिहासिक स्वागत करण्यात आले. पंतप्रधान कमला प्रसाद बिस्सेसर आणि संपूर्ण मंत्रिमंडळ पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते. हे जागतिक स्तरावर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाबद्दलचा आदर दर्शवतात.
दरम्यान, पंतप्रधान मोदींचा त्रिनिदाद आणि टोबॅगोचा हा पहिलाच अधिकृत द्विपक्षीय दौरा आहे. १९९९ नंतर, म्हणजेच गेल्या पंचवीस वर्षातील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोची ४० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या भारतीय वंशाची आहे. येथील राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष देखील भारतीय वंशाचे आहेत. त्यामुळे हा देश भारतासाठी खास आहे. यावेळी भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील राम मंदिर आणि महाकुंभाचा उल्लेख केला. त्यांनी कमला प्रसाद बिस्सेसर यांना राम मंदिराची प्रतिकृती आणि सरयू नदीचे पवित्र पाणी देखील भेट दिले.