PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:28 IST2025-12-17T14:27:15+5:302025-12-17T14:28:12+5:30
मध्य पूर्वेत भारताची पॉवर वाढणार!

PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
Narendra Modi-S Jaishankar: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर एकाच वेळी मिडल ईस्टच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी जॉर्डननंतर ओमानला भेट देणार आहेत, तर जयशंकर इजराइलच्या दौऱ्यावर आहेत. मुस्लिम आणि ज्यू देशांशी एकाचवेळी संवाद साधत भारताने जागतिक पातळीवर संतुलित, सक्रिय आणि बहुपक्षीय कूटनीतीचा स्पष्ट संदेश दिला आहे.
पीएम मोदींचा जॉर्डन-ओमान दौरा
पंतप्रधान मोदींनी मिडल ईस्ट दौऱ्याची सुरुवात जॉर्डनपासून केली. त्यानंतर ते आफ्रिकेतील इथिओपिया आणि मुस्लिम देश ओमानला भेट देणार आहेत. सध्याच्या जागतिक परिस्थितीत व्यापारातील तणाव, ऊर्जा संकट, सुरक्षा आव्हाने आणि भूराजकीय अनिश्चितता, या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.
सऊदी-यूएईवर अवलंबित्व कमी करण्याचे संकेत
जॉर्डन आणि ओमानशी संबंध दृढ करण्यामागे भारताचा उद्देश मिडल ईस्टमध्ये केवळ सऊदी अरेबिया आणि यूएईपुरते मर्यादित न राहता इतर प्रभावी देशांशीही रणनीतिक भागीदारी वाढवण्याचा आहे.
जॉर्डन : पश्चिम आशियातील महत्त्वाचा जिओ-पॉलिटिकल हब
जॉर्डनची सीमा इराक, सीरिया, इजराइल आणि पॅलेस्टाईनशी लागून असल्याने तो संपूर्ण पश्चिम आशियासाठी महत्त्वाचा भूराजकीय केंद्रबिंदू मानला जातो. येथे भारताची पकड मजबूत झाल्यास इतर अरब देशांतील भारताचा प्रभाव वाढण्यास मदत होईल.
ओमानसोबत CEPA आणि संरक्षण सहकार्याची शक्यता
भारत-ओमान दरम्यान संभाव्य व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) होण्याची शक्यता आहे. हा करार झाल्यास दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळेल. ओमान आधीपासूनच खाडी क्षेत्रातील भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे. त्यामुळे पीएम मोदींचा हा दौरा भारताची कूटनीती, व्यापार आणि रणनीतिक हितसंबंध अधिक बळकट करणारा ठरू शकतो.
जयशंकरांचा इस्राइल दौरा
दुसरीकडे, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आपल्या दोन दिवसांच्या इस्राइल दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, परराष्ट्र मंत्री गिदोन सार आणि उद्योग मंत्री नीर बरकत यांच्याशी चर्चा केली. ही भेट पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्यातील दूरध्वनी चर्चेनंतर झाली असून, दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.
इस्राइल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचे महत्त्व
इस्राइल-हमास संघर्ष आणि मिडल ईस्टमधील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जयशंकरांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यातून भारत मतभेद कमी करणे, आर्थिक संधी वाढवणे आणि सुरक्षा हितांचे संरक्षण करणे, या तिन्ही आघाड्यांवर सक्रिय भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट होते.
नव्या MoUची शक्यता
या चर्चेतून नवीन मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग (MoU) होण्याची शक्यता असून, संयुक्त प्रकल्प आणि तंत्रज्ञान सहकार्याला गती मिळू शकते. भारताची ही भूमिका ‘मल्टीपोलर एंगेजमेंट’प्रतीची ठाम बांधिलकी दर्शवते. महत्वाचे म्हणजे, इस्राइलमध्ये पोहोचताच जयशंकर यांनी जागतिक स्तरावर दहशतवादविरोधात कडक संदेश दिला. सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचाही त्यांनी तीव्र निषेध केला. भारत आणि इजराइल दोन्ही देशांची आतंकवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि या लढ्यात भारताला पाठिंबा दिल्याबद्दल इजराइलचे आभार मानले.