...तेव्हा यूकेच्या पंतप्रधानांना डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले; पाकवर सैन्य कारवाई करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 08:57 IST2019-09-20T08:53:44+5:302019-09-20T08:57:15+5:30
डेविड कैमरन यांनी मनमोहन सिंग यांना संतपुरुषाची उपमा देत सांगितले की, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत माझे संबंध चांगले होते.

...तेव्हा यूकेच्या पंतप्रधानांना डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले; पाकवर सैन्य कारवाई करणार
लंडन - जर मुंबईप्रमाणे दुसरा दहशतवादी हल्ला झाला तर भारतपाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई करणार असं भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले होते असा खुलासा ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेविड कैमरन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना केला. कैमरन यांनी 'फॉर द रिकॉर्ड' या कार्यक्रमात त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील घटनांवर भाष्य केलं. त्यात 2010 ते 2016 दरम्यानच्या घटनांवर विशेष भाष्य केलं.
डेविड कैमरन यांनी मनमोहन सिंग यांना संतपुरुषाची उपमा देत सांगितले की, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत माझे संबंध चांगले होते. ते खूप कमी बोलत मात्र भारताच्या विरोधात काम करणाऱ्यांबाबत ते कडक भूमिका घेत होते. एका प्रवासादरम्यान त्यांनी मला सांगितले की, मुंबईत 2008 मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला तसा दुसरा दहशतवादी हल्ला झाल्यास भारत पाकिस्तानविरोधात सैन्य कारवाई करेल.
या कार्यक्रमात बोलताना डेविड कैमरन यांनी भारत-ब्रिटन यांच्यातील संबंधांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी वेम्बले स्टेडियममध्ये संबोधित करताना स्टेजवर मोदी यांची गळाभेट घेतलेल्या घटनेवर म्हणाले की, अनेकदा मला वेम्बले स्टेडियममध्ये मूळ भारतीय लोकांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. लोकांच्या घोषणाबाजीने संपूर्ण कार्यक्रम उत्साहित झाला. त्यावेळी स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट करुन ब्रिटनकडून त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले हे संकेत दिले.