Plane Crashes In Philadelphia: दोन दिवसांपूर्वी अमेरिका येथील वॉशिंग्टन डीसीमधील पेनसिल्व्हेनिया येथे विमान अपघात झाला होता. या अपघातात ६७ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अमेरिकेत आणखी एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. येथील फिलाडेल्फियामध्ये विमानाचा अपघात झाला असून यामध्ये आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
वृत्तसंस्था एएफपीने स्थानिक माध्यमांचा हवाला देत म्हटले आहे की, एका लहान विमानाचा अपघात झाला. या विमानात दोन लोक प्रवास करत होते. या विमानाचा अपघतात झाल्यानंतर ते अनेक घरांना धडक देत एका शॉपिंग मॉलवर कोसळले. त्यामुळे या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, फिलाडेल्फिया आपत्कालीन व्यवस्थापन कार्यालयाने सोशल मीडियावर घटनेची पुष्टी केली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कार्यालयाने एक मोठी घटना घडल्याचे म्हटले आहे. मात्र, कार्यालयाकडून इतर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
याचबरोबर, या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात विमान अनेक घरांवर आदळल्याचे दिसून येते, ज्यामुळे हा अपघात झाला आणि घरांना आग लागली. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, विमानाने संध्याकाळी सहा वाजता विमानतळावरून उड्डाण केले. विमान १,६०० फूट उंचीवर पोहोचल्यानंतर जवळपास ३० सेकंदांनी ते रडारवरून गायब झाले. ही घटना ईशान्य फिलाडेल्फिया विमानतळापासून सुमारे ४.८ किलोमीटर अंतरावर घडली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपू्र्वी अमेरिकन एअरलाइन्सचे जेट विमान रेगन विमानतळावर उतरत असताना त्याची लष्करी हेलिकॉप्टरशी बुधवारी रात्री धडक झाली. या विमानात ६० प्रवासी, चार कर्मचारी असे ६४ लोक व हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते. या सर्वांचा मृत्यू झाला. पोटोमॅक नदीकिनारी तसेच नदीपात्रात घेतलेल्या शोधानंतर २८ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर रेगन विमानतळावरून होणारी उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला होता.