शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 13:46 IST2026-04-12T13:43:34+5:302026-04-12T13:46:17+5:30
इस्लामाबाद शांतता वार्ता फिस्कटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नौसैनिक नाकाबंदीची धमकी दिली आहे.

शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली शांतता वार्ता कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपल्याने आता जागतिक स्तरावर युद्धाचा धोका अधिक गडद झाला आहे. इराणने झुकण्यास नकार दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, इराणची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी 'नौसैनिक नाकाबंदी' करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर एक लेख शेअर करत या रणनीतीचा खुलासा केला.
काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन?
ट्रम्प यांनी शेअर केलेल्या लेखानुसार, जर इराणने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर अमेरिका इराणच्या समुद्रकिनाऱ्यावर नौदलाचा वेढा घालेल. यामुळे इराणला होणारा व्यापार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इराणची लाईफलाईन असलेला तेल निर्यात पूर्णपणे ठप्प होईल. ट्रम्प यांचा दावा आहे की, या पावलामुळे केवळ इराणची अर्थव्यवस्थाच कोलमडणार नाही, तर इराणकडून तेल घेणाऱ्या भारत आणि चीनसारख्या देशांवरही राजनैतिक दबाव वाढेल.
व्हेनेझुएलाचा दाखला आणि पाषाण युगाची धमकी
ट्रम्प यांनी यापूर्वी व्हेनेझुएलावर अशाच प्रकारची नाकाबंदी लावून तिथल्या निकोलस मादुरो सरकारची अर्थव्यवस्था गुडघ्यावर आणली होती. त्याच यशाची पुनरावृत्ती इराणच्या बाबतीत करण्याचा त्यांचा मानस आहे. "एक तर तेहरानवर भयंकर बॉम्बफेक करून त्यांना पाषाण युगात धाडू किंवा नौदल तैनात करून त्यांच्या अर्थव्यवस्थेचा गळा घोटू," असा कडक इशारा या लेखातून देण्यात आला आहे.
अमेरिकेचे सर्वात शक्तीशाली हत्यार
या नाकाबंदीचे नेतृत्व करण्यासाठी अमेरिका आपले सर्वात मोठे आणि आधुनिक विमानवाहू जहाज 'USS Gerald R. Ford' (CVN-78) तैनात करू शकते. हे जहाज अमेरिकेचे ३८ वे राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांच्या नावाने ओळखले जाते. हे जहाज म्हणजे समुद्रात तरंगणारे एक लष्करी शहर असून, त्यावरून एकाच वेळी अनेक लढाऊ विमाने हल्ल्यासाठी उड्डाण करू शकतात. वेनेझुएलाच्या नाकाबंदीतही याच जहाजाचा वापर करण्यात आला होता.
भारत आणि चीनवर काय परिणाम होणार?
इराण हा भारताचा महत्त्वाचा तेल पुरवठादार देश आहे. जर, अमेरिकेने नौसैनिक नाकाबंदी केली, तर इराणमधून येणारे तेल थांबेल. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता असून भारतासारख्या विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसू शकतो. इस्लामाबादमधील चर्चेच्या अपयशानंतर आता पुढील ४८ तास जगासाठी अत्यंत तणावाचे ठरणार आहेत. ट्रम्प खरोखरच नाकाबंदीचे आदेश देतात की इराण माघार घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.