अमेरिकेने पाकिस्तानचे लाड सुरुच ठेवले आहेत. आता अमेरिकेने पाकिस्तानच्या दक्षिणेकडील प्रांतात सक्रिय असलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला परदेशी दहशतवादी संघटना घोषित केले आहे. ही माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिली आहे. बीएलएला माजिद ब्रिगेड म्हणूनही ओळखले जाते, ते गेल्या अनेक दशकांपासून स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढत आहेत.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने याबाबत एक पत्रही जारी केले आहे. परराष्ट्र विभाग बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तिच्याशी संलग्न असलेल्या मजीद ब्रिगेडला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित करत आहे, असं या पत्रामध्ये म्हटले आहे. यापूर्वी, बीएलएला स्पेशली डेजिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट ऑर्गनायझेशनमध्ये आधीच समाविष्ट करण्यात आले होते. अमेरिकेने २०१९ मध्ये ही कारवाई केली.
ट्रेन अपहरण आणि आत्मघातकी हल्ल्यांवरील कारवाई
'बीएलए अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले आहे. २०१९ पासून, त्यांनी सतत अनेक अतिरिक्त हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे. २०२४ मध्ये, बीएलएने कराची विमानतळ आणि ग्वादर बंदर प्राधिकरण संकुलाजवळ आत्मघाती हल्ले केल्याचा दावा केला. त्यानंतर, २०२५ मध्ये, बीएलएने दावा केला की त्यांनी मार्चमध्ये क्वेटाहून पेशावरला जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केले, यामध्ये ३१ नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी मारले गेले. ट्रेनमध्ये ३०० हून अधिक प्रवासी होते ज्यांना ओलीस ठेवण्यात आले होते, असंही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.
अमेरिका दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी वचनबद्ध
बीएलएला दहशतवादी यादीत टाकण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या पावलावरून अमेरिका दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी वचनबद्ध असल्याचे दिसून येते. पत्रात म्हटले आहे की दहशतवादी संघटनांची ही यादी तयार करण्याचा उद्देश हे धोके कमी करणे आहे.