भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यानभारतासमोर अक्षरशः गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी परदेशात जाऊन मोठी-मोठी विधाने करायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी बेल्जियममध्ये केलेल्या एका विधानामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. मुनीर यांनी दावा केला की, भारताला शस्त्रसंधीची (Ceasefire) मागणी करण्यास पाकिस्तानने भाग पाडले. मात्र, भारताने हे दावे पूर्णपणे फेटाळले आहेत.
पाकिस्तानचे दावे खोटे
भारताने स्पष्ट केले आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानमध्ये प्रचंड नुकसान झाल्यानंतर पाकिस्तानकडूनच भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधण्यात आला होता. तेव्हा पाकिस्ताननेच शस्त्रसंधीची मागणी केली, जी भारताने स्वीकारली. भारत-पाकिस्तानच्या या शस्त्रसंधीमध्ये अमेरिका किंवा डोनाल्ड ट्रम्प यांची कोणतीही भूमिका नव्हती, हेही भारताने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेला दिले होते स्पष्टीकरण
१० मे रोजी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना फोन केला होता. त्यावेळी जयशंकर यांनी स्पष्ट केले होते की, पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला भारत जोरदार प्रत्युत्तर देईल. जयशंकर यांनी हेही सांगितले होते की, जर पाकिस्तानने भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधला, तरच शस्त्रसंधीचा विचार केला जाईल.
मुनीर यांची ‘हवाहवाई’ विधाने!
११ ऑगस्ट रोजी ब्रसेल्समध्ये ‘ओव्हरसीज पाकिस्तानी फाउंडेशन’च्या एका कार्यक्रमात मुनीर यांनी पुन्हा खोटे दावे केले. त्यांनी ५०० लोकांच्या उपस्थितीत दावा केला की, भारतानेच पहिल्यांदा शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला होता. या कार्यक्रमात कोणालाही मोबाईल किंवा रेकॉर्डिंग डिव्हाईस घेऊन जाण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे मुनीर यांना खोटे बोलण्याची पूर्ण मोकळीक मिळाली होती. सुमारे ४० मिनिटे चाललेल्या भाषणात मुनीर यांनी स्वतःचीच स्तुती केली. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमाने पाडली आणि जोरदार प्रत्युत्तर दिले.
मुनीर म्हणाले की, भारत फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःला दहशतवादाचा बळी असल्याचे सांगतो, तर तोच पाकिस्तानमध्ये सीमापार दहशतवादाला पाठिंबा देतो. भारताकडे ट्रम्प यांच्या हस्तक्षेप आणि शस्त्रसंधीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असेही मुनीर म्हणाले.
भारताने उघड केली पाकिस्तानची पोलखोल
‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भात मुनीर यांनी असे खोटे दावे करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी वॉशिंग्टनमध्येही त्यांनी अशीच विधाने केली होती. मुनीर अशी विधाने केवळ पाकिस्तानी लोकांसाठीच करतात, हे विशेष आहे.
भारताने पाकिस्तानच्या या दाव्यांवर टीका केली आहे. परदेशी मदतीसाठी पाकिस्तान नेहमीच धडपडत असतो. हे पाकिस्तानमधील लोकशाहीची स्थिती दर्शवते. भारताने हेही सांगितले की, पाकिस्तान ज्या प्रकारे अण्वस्त्रांबाबत विधाने करतो, त्यातून त्यांची गंभीरता दिसून येते. आंतरराष्ट्रीय समुदायानेही त्यांच्या या 'बडबडी'कडे लक्ष द्यायला हवे.