आजवर भारताला त्रास दिला...! पाकिस्तानी सैन्याला चौकीही वाचविता येईना, अफगानिस्तान बॉर्डरवर नामुष्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 09:55 IST2024-12-31T09:53:39+5:302024-12-31T09:55:07+5:30
पाकिस्तान आणि अफगानिस्तानमध्ये सध्या एकमेकांवर हल्ल्यांचे सत्र सुरु झाले आहे. तालिबानचे दहशतवाद्यांनी दोन देशांमधील असलेली ड्युरंड लाईन पार केली असून पाकिस्तानी चौक्यांवर बॉम्ब हल्ले केले जात आहेत.

आजवर भारताला त्रास दिला...! पाकिस्तानी सैन्याला चौकीही वाचविता येईना, अफगानिस्तान बॉर्डरवर नामुष्की
गेली कित्येक दशके जसा पाकिस्तानने भारताला त्रास दिला, तसाच त्रास आता पाकिस्तानला होत आहे. आता तर पाकिस्तानवर नामुष्कीची वेळ ओढविली आहे. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणारे पाकिस्तानी लष्कर त्यांच्या चौक्या अफगानिस्तानी दहशतवाद्यांपासून वाचवू शकत नाहीय. ज्या तालिबानी दहशतवाद्यांना अफगानिस्तानचे सरकार उलथविण्यासाठी पाकिस्तानने मदत केली तेच आता पाकिस्तानवर उलटले आहेत. तहरीक ए तालिबान या संघटनेने पाकिस्तानी सैन्याची एक चौकी ताब्यात घेतली आहे. याचा व्हिडीओही व्हायरल करण्यात आला आहे.
पाकिस्तान आणि अफगानिस्तानमध्ये सध्या एकमेकांवर हल्ल्यांचे सत्र सुरु झाले आहे. तालिबानचे दहशतवाद्यांनी दोन देशांमधील असलेली ड्युरंड लाईन पार केली असून पाकिस्तानी चौक्यांवर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांना घाबरून पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळून जाऊ लागल्याचे दृष्य समोर आले आहे.
बॉर्डरवर टीटीपीने पाकिस्तानी चौकी ताब्यात घेतली आहे. टीटीपीने याचा व्हिडीओ जारी केला आहे. यावर आता नाचक्की होऊ लागल्याने पाकिस्तानने ती चौकी आम्ही काही दिवसांपूर्वीच रिकामी केल्याची सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की, तेथील सैन्याला आम्ही दुसरीकडे हलविले आहे.
🔴 #BREAKING New viral videos of Pakistani Taliban taking over a military checkpost in #Bajaur. Such repeated failures happen mainly because #PakistanArmy is too busy playing politics & oppressing citizens of the country while not doing its actual job on the borders of Pakistan pic.twitter.com/7vt2KzCEHq
— Taha Siddiqui (@TahaSSiddiqui) December 30, 2024
सोशल मीडियावर टीटीपीचे दहशतवादी पाकिस्तानी पोस्ट ताब्यात घेतल्यानंतर आनंद साजरा करताना दिसत आहेत. त्यांनी पाकिस्तानचा झेंडा उखडून फेकला असून टीटीपीचा झेंडा रोवला आहे. पाकिस्तानने जर ती चौकी आपणहूनच सोडली होती तर तिथे पाकिस्तानी झेंडा का फडकत होता असा सवालही आता नेटकरी विचारत आहेत.