'ऑपरेशन सिंदूर'नंतर अवघ्या जगाने भारताची ताकद पाहिली. या मोहिमेनंतर पाकिस्तानलाभारताच्या शक्तीचा अंदाज आला आणि त्यांनी आपल्या देशाची सुरक्षा आणखी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इस्लामाबाद येथे आयोजित 'मार्का-ए-हक' सोहळ्या दरम्यान 'पाकिस्तान आर्मी रॉकेट फोर्स कमांड'ची घोषणा केली.
पाकिस्तानचा हा नवा लष्करी विभाग मोठ्या प्रमाणात पारंपारिक क्षेपणास्त्रे आणि रॉकेट तैनात करण्यासाठी तयार केला जात आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने 'फतेह' मिसाईल आणि इतर क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश असेल.
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या चिंतेत पडली भर!ऑपरेशन सिंदूरमधील दारुण पराभव आणि भारताच्या शक्तिशाली क्षेपणास्त्र क्षमतेमुळे पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. पाकच्या लष्करचा हा नवा विभाग विद्यमान आर्मी स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडच्या (ASFC) समांतर काम करेल. परंतु, त्यात अण्वस्त्रांऐवजी फक्त पारंपारिक क्षेपणास्त्रे आणि रॉकेट यांचा समावेश असेल.
पाकिस्तानच्या लष्करी रणनीतीत बदल!पाकिस्तानच्या या पावलाकडे भारताच्या ब्रह्मोस, पृथ्वी आणि अग्नि मालिकेसारख्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र शक्तीसमोर स्वतःचे संतुलन साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. पाकिस्तानने उचललेले हे पाऊल लष्करी रणनीतीतील बदल म्हणून पाहिले जात आहे.
भारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर'ऑपरेशन सिंदूर'चे यश हे भारताच्या लष्करी रणनीतीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने सर्वोत्तम कामगिरी केली ज्यामुळे पाकिस्तानला योग्य उत्तर मिळाले. भारतीय सैन्याने क्षेपणास्त्रे आणि आधुनिक शस्त्रे वापरून शत्रूचा पराभव केला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने जगाला दाखवून दिले की, तो आता पूर्वीचा भारत राहिलेला नाही, तर या नवीन भारताची संरक्षण क्षमता पूर्वीपेक्षा अनेक पटींनी वाढली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरही, भारत आपली संरक्षण क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलत आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ् उद्ध्वस्त केली आणि १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर भारताच्या शत्रूंना भारतीय सैन्याच्या ताकदीची कल्पना आली.