Pakistan : टॉमेटो ५००, कांदे ४०० रूपये... आता पाकिस्तानची माघार; भारतासोबत व्यापार करण्यासाठी तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 19:58 IST2022-08-29T19:57:00+5:302022-08-29T19:58:48+5:30
उपासमारीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानने अखेर भारतासोबत पुन्हा व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pakistan : टॉमेटो ५००, कांदे ४०० रूपये... आता पाकिस्तानची माघार; भारतासोबत व्यापार करण्यासाठी तयार
उपासमारीच्या उंबरठ्यावर असलेल्या शेजारी देश पाकिस्तानने अखेर भारतासोबत पुन्हा व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सध्या भीषण पुराशी झुंज देत आहे. कोट्यवधी लोकांना पुराचा फटका बसला आहे. तर दुसरीकडे महागाई गगनाला भिडत आहे. दरम्यान, लाहोर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील इतर भागात आलेल्या विनाशकारी पुरामुळे विविध भाज्या आणि फळांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. हे पाहता पाकिस्तान सरकार भारतातून टोमॅटो आणि कांद्याची आयात करणार आहे.
पाकिस्तान पुन्हा भारतोसोबत व्यापार सुरू करणार असल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी सोमवारी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांच्या हवाल्याने दिले. पाकिस्तान भारतासोबत व्यापार (खुला व्यापार मार्ग) पुन्हा सुरू करेल, अशी घोषणा पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी ही केली, "या पूर आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे आम्ही भारतासोबत व्यापार मार्ग पुन्हा सुरू करू,” असे ते म्हणाले.
"रविवारी लाहोरच्या बाजारात टोमॅटो आणि कांद्याचा भाव अनुक्रमे ५०० आणि ४०० रुपये किलो होता. मात्र, रविवारच्या बाजारात टोमॅटो, कांद्यासह इतर भाज्या नेहमीच्या बाजारापेक्षा 100 रुपये किलोने कमी दराने उपलब्ध होत्या,” अशी माहिती लाहोर मार्केटमधील घाऊक विक्रेते जवाद रिझवी यांनी पीटीआयशी बोलताना दिली.
भारताची भूमिका काय?
अटारी-वाघा सीमेवरून भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करण्याच्या पर्यायावर सरकार विचार करत असल्याचे कळते. सध्या अफगाणिस्तानमधून लाहोर आणि पंजाबमधील अन्य शहरांमध्ये तोरखाम सीमेवरून टोमॅटो, कांद्याचा पुरवठा केला जात आहे. लाहोर बाजार समितीचे सचिव शहजाद चीमा म्हणाले की, पुरामुळे बाजारात सिमला मिरचीसारख्या भाज्यांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. “सरकार भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करू शकते. इराणमधून ताफतान सीमेवरून (बलुचिस्तान) भाजीपाला आयात करणे तितके सोपे नाही.0 इराण सरकारने आयात आणि निर्यातीवर कर वाढवला आहे,” असेही त्यांनी सांगितले.