भारतीय उच्चायुक्तांना पाकिस्तानने परत पाठवले, भारतासोबतचे व्यापारी संबंधही तोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 06:18 IST2019-08-08T03:32:12+5:302019-08-08T06:18:48+5:30
१५ ऑगस्टला पाक काळा दिवस पाळणार; ३७० कलम रद्दबातल केल्याने जळफळाट

भारतीय उच्चायुक्तांना पाकिस्तानने परत पाठवले, भारतासोबतचे व्यापारी संबंधही तोडले
इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्दबातल केल्याने जळफळाट झालेल्या पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परत पाठवले आहे. शिवाय त्यांचे भारतातील उच्चायुक्त मोईन उल हक्क यांना माघारी बोलावून घेतले आहे.
यासोबतच भारताबरोबरचे व्यापारी संबंधही तोडण्याचा तसेच राजनैतिक संबंध निम्नस्तरावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
काश्मीरबाबतच्या भारताच्या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रात धाव घेण्याचे पाकिस्तानने ठरवले आहे. १५ ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णयही पाकने जाहीर केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले. कातावलेल्या पाकिस्तानने आपल्या पार्लमेंटचे तातडीचे संयुक्त अधिवेशन मंगळवारी बोलावले आणि ३७० कलमाचा निर्णय घेतल्याने पुलवामासारखे आणखी हल्ले होण्याची शक्यता असल्याची दर्पोक्ती पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. भारताने ३७0 कलम रद्द केल्याने आणि लडाख हे वेगळे केंद्रशासित राज्य म्हणून जाहीर केल्यामुळे नाराजी व्यक्त करणाऱ्या चीनने कैलास मानसरोवरला जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांना व्हिसा नाकारला आहे. (वृत्तसंस्था)
काश्मीरमधील स्थितीचा पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. भारताने काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत उपस्थित करण्याचे पाकिस्तानने ठरविले आहे. काश्मिरी जनतेला समर्थन देण्यासाठी यंदा १४ ऑगस्टला पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.