दिल्ली स्फोटानंतर पाकिस्तानला भारताच्या हल्ल्याची भीती; ख्वाजा आसिफ म्हणाले- 'आम्ही युद्धास...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:15 IST2025-11-13T16:15:30+5:302025-11-13T16:15:59+5:30
Pakistan on Delhi Blast: पाकिस्तानला एकीकडे अफगाणिस्तान, तर दुसरीकडे भारतीय हल्ल्याची भीती सतावत आहे.

दिल्ली स्फोटानंतर पाकिस्तानला भारताच्या हल्ल्याची भीती; ख्वाजा आसिफ म्हणाले- 'आम्ही युद्धास...'
Pakistan on Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बब्लास्टनंतर पाकिस्तान चिंतेत पडला आहे. भारताने या घटनेला स्पष्टपणे दहशतवादी हल्ला घोषित केल्यामुळे, आपल्यावर भारत हल्ला करेल, अशी भीती पाकिस्तानला सतावत आहे. अशातच, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताविरुद्ध उघडपणे आक्रमक भूमिका घेतली आहे.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तान पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमेवर युद्ध लढण्यासाठी तयार आहे. त्यांनी असाही दावा केला की, अल्लाहने पहिल्या फेरीत आमची मदत केली आणि दुसऱ्या फेरीतही करेल.
कालपर्यंत सिलिंडर स्फोट म्हणत होते, आता...
दिल्लीस्फोटावर बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले , कालपर्यंत भारत याला सिलिंडरचा स्फोट म्हणत होते, पण आता ते याला परदेशी कट म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत कधीही पाकिस्तानवर आरोप करू शकतो. त्यांच्या या वक्तव्याला भारतात “गीदडभभकी” म्हणून पाहिले जात आहे, कारण पाकिस्तान स्वतः दहशतवादाला आश्रय देत असल्याचे पुरावे जगासमोर वारंवार येत राहतात.
पाकिस्तानला दोन्ही बाजूने भीती
पाकिस्तानची पूर्व सीमा भारताशी तर पश्चिम सीमा अफगाणिस्तानशी लागते. या दोन्ही बाजूंनी दबाव वाढल्याने पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. अफगाणिस्तानातील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या संघटनेने नुकतेच इस्लामाबाद न्यायालय परिसरातील स्फोटाची जबाबदारी स्वीकारली, तरीही पाकिस्तानचे नेते भारताविरुद्ध बोलत आहेत.
टीटीपीचा थेट पाकिस्तानला इशारा
टीटीपीने अलीकडे एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन आपले ठिकाण पाकिस्तानच्या पंजाबमध्ये असल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओत टीटीपी सदस्यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्कराला “क्रूर” म्हणत थेट आव्हान दिले आहे. पाकिस्तानी सेना आणि सरकारमध्ये मुजाहिदीनविरुद्ध लढण्याची ताकद नाही, असा दावा टीटीपीने केला आहे. त्यांनी पुढे पाकिस्तान सरकारच्या पतनाची भविष्यवाणीही केली.
भारताकडून कठोर भूमिका
भारताने दिल्लीतील हल्ल्यानंतर स्पष्ट केले आहे की दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान भेटीदरम्यान जगाला संदेश दिला की, ज्यांनी हा कट रचला आहे, त्यांना त्यांच्या कृत्याची किंमत चुकवावीच लागेल. याआधीच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये भारताने केलेली कारवाई पाकिस्तानला अजूनही विसरता आलेली नाही. त्यामुळे या वेळीही भारताकडून अशाच प्रकारच्या प्रत्युत्तराची शक्यता असल्याने पाकिस्तानची चिंता वाढली आहे.