पाकिस्तान : नवाज शरीफ यांना पक्षाध्यक्ष पदावरून हटवलं, सर्वोच्च न्यायालयाचा जबर दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 16:04 IST2018-02-22T16:02:35+5:302018-02-22T16:04:39+5:30
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. येथील सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना जबर दणका दिला आहे.

पाकिस्तान : नवाज शरीफ यांना पक्षाध्यक्ष पदावरून हटवलं, सर्वोच्च न्यायालयाचा जबर दणका
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. येथील सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना जबर दणका दिला आहे. पाकिस्तानातील सत्ताधारी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे (पीएमएल-एन) अध्यक्ष नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने अधयक्षपदासाठी अयोग्य ठरवलं आहे. म्हणजे शरीफ यांना आता पक्षाध्यक्ष पदावरूनही पायउतार व्हावं लागणार आहे.
न्यायमूर्ती सादिक निसार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपिठाने हा निर्णय दिला. पाकिस्तानच्या संसदेने गेल्या वर्षी इलेक्शन एक्ट 2017 हे बिल पारित केलं होतं. गेल्या वर्षी पनामा पेपर लिक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना पंतप्रधानपदावरून हटवलं होतं, त्यानंतर शरीफ यांनी पक्षाध्यक्ष राहावं यासाठी इलेक्शन एक्ट 2017 हे बिल पारित करण्याचा छुपा मार्ग काढण्यात आला होता. पण अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दणका दिला आहे.
गेल्या वर्षी नवाज शरीफ यांना पनामागेट प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवत पंतप्रधानपदावरुन हटवलं. पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. मागील वर्षी पनामा पेपर लीकमुळे याचा खुलासा झाला होता. संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) नवाज शरीफ प्रकरणाचा तपास केला होता. जेआयटीच्या अहवलात शरीफ आणि कुटुंबीयांवरील आरोप योग्य असल्याचं सिद्ध झालं होतं.