हिंदूंचा अपमान भोवला; पाकिस्तानी मंत्र्यावर राजीनामा देण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 19:24 IST2019-03-05T19:20:49+5:302019-03-05T19:24:37+5:30
सोशल मीडिया, स्वपक्षातून टीकेची झोड उठल्यानंतर मंत्र्याचा राजीनामा

हिंदूंचा अपमान भोवला; पाकिस्तानी मंत्र्यावर राजीनामा देण्याची वेळ
इस्लामाबाद: हिंदूंबद्दल केलेलं अपमानास्पद विधान पाकिस्तानच्या मंत्र्याला महागात पडलं आहे. आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल पंजाब प्रांताचे सांस्कृतिक मंत्री फय्याजुल हसन चौहान यांना राजीनामा द्यावा लागला. चौहान यांच्या विधानाचे पाकिस्तानात तीव्र पडसाद उमटले होते. त्यांच्यावर जनतेतून आणि पक्षातून जोरदार टीका झाली होती.
चौहान यांनी एका पत्रकार परिषदेत हिंदूंचा अपमान करणारी विधानं केली. हिंदू समाज गायीचं मूत्र पितो, असं चौहान म्हणाले होते. यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. पाकिस्तानात ट्विटरवर #SackFayazChohan ट्रेंडिगमध्ये होता. अनेकांनी हा हॅशटॅग वापरुन चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
Dawn News: Punjab Information and Culture Minister Fayyazul Hassan Chohan has resigned following his derogatory remarks against Hindus #Pakistan (file pic) pic.twitter.com/IuSxAWfflh
— ANI (@ANI) March 5, 2019
'आपण मुस्लिम आहोत आणि आपल्याकडे ध्वज आहे. हा ध्वज मौला अली यांच्या शौर्याचा आहे. हा ध्वज हजरत उमर यांच्या ध्यैर्याचा आहे. तुम्हा हिंदूंकडे असा ध्वज नाही. हा ध्वज तुमच्या हातात नाही,' असं वादग्रस्त विधान फय्याजुल चौहान यांनी केलं होतं. 'तुम्ही आमच्यापेक्षा सातपट जास्त चांगले आहात, या भ्रमात राहू नका. मूर्तीची पूजा करणाऱ्यांनो, जे आमच्याकडे आहे, ते तुमच्याकडे नाही,' असं चौहान म्हणाले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चौहान यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली होती. माझं विधान पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांबद्दल नव्हतं, तर ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात होतं, अशी सारवासारव त्यांनी केली.