इस्लामाबाद : पाकिस्तान दिवाळखोरीकडे वेगात वाटचाल करत असून कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशवासियांना उद्देशून संदेश जारी केला आहे. गेल्या 10 वर्षांत पाकिस्तानवरील कर्ज 6 हजारावरून 30 हजार अब्जांवर पोहोचले आहे. यामुळे देशातीस नागरिकांनीच मदत करावी असे आवाहन खान यांनी केले आहे.
पाकिस्तानवर वाढत्या कर्जाच्या काळात इम्रान खान पंतप्रधान झाले आहेत. अशातच देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना अमेरिकेनेही मदत थांबविली आहे. यामुळे पाकिस्तानची हालत गंभीर बनली आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी खान यांनी अधिकाऱ्यांवरील उधळपट्टी, वाहनांवरील खर्च थांबविला होता. तरीही कर्जाच्या मानाने हा खर्च नगण्यच असल्याने शेवटी इम्रान खान यांनी लोकांनाच मदतीचे आवाहन केले आहे.
तसेच इम्रान यांनी त्यांच्या मंत्र्यांनाही साधे राहण्याचे आदेश दिले आहेत. मंत्र्यांनी समाजात वावरताना साधे राहणीमान ठेवावे. देशावर असलेल्या आर्थिक संकटाची जाणीव ठेवावी, असे त्यांनी मंत्र्यांना सांगितले आहे.