पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 22:44 IST2025-09-23T22:41:37+5:302025-09-23T22:44:07+5:30
पाकिस्तानात बंडखोर गटाने एका एक्स्प्रेस ट्रेनला आईडीने लक्ष्य करत मोठा स्फोट घडवून आणला.

पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
Pakistan Jaffar Express:पाकिस्तान सध्या एका मोठ्या गृहयुद्धाशी झुंजत आहे. एकीकडे लष्कराच्या हवाई हल्ल्यात ३० हून अधिक लोक ठार झाल्यानंतर खैबर पख्तूनख्वा प्रांतात आंदोलने सुरू आहेत. तर दुसरीकडे बलुचिस्तान प्रांतातील फुटीरतावादी बंडखोर गट पाकिस्तानी सैन्याला सतत लक्ष्य करत आहेत. अशातच मंगळवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा-पेशावर मार्गावर धावणाऱ्या जाफर एक्सप्रेसला अपघात झाला.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील मास्तुंग जिल्ह्यातील दश्त भागात जाफर एक्सप्रेसमध्ये एक शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटामुळे ट्रेन रुळावरून घसरली आणि ती उलटली. या अपघातामुळे घटनास्थळी घबराट पसरली आणि प्रवासी घाबरून पळून गेले. एका बलुचिस्तान बंडखोर गटाने ट्रॅकवर बॉम्बस्फोट करून ट्रेनला लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. काही तासांपूर्वीच पाकिस्तानी लष्कराच्या जवानांवर हल्ला करण्यात आला होता.
जाफर एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरून घसरल्यामुळे किमान चार जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. पेशावरहून क्वेट्टाला जाणारी जाफर एक्स्प्रेस ही ट्रेन बलुचिस्तानमधील स्पेझंद शहराजवळून जात असताना रेल्वे रुळांवर स्फोट घडवून आणला. बलुच रिपब्लिकन गार्ड्सने एक निवेदन जारी करून हा स्फोट घडवल्याचा दावा केला. ट्रॅकवर केलेल्या आयईडी स्फोटात अनेक पाकिस्तानी सैन्य सैनिक मारले गेले आणि जखमी झाल्याचे बलुच गटाने म्हटलं. बलुच रिपब्लिकन गार्ड्सचे प्रवक्ते दोस्तैन बलोच यांनी म्हटलं की, "आज संध्याकाळी, मास्तुंगच्या दश्त भागात जाफर एक्सप्रेसला रिमोट-कंट्रोल्ड आयईडीने लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये अनेक पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार आणि जखमी झाले."
या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांचे अपयश देखील समोर आले आहे. कारण काही तासांपूर्वीच त्याच भागात रेल्वे ट्रॅक साफ करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांवर आयईडीने हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये अनेक सैनिक गंभीर जखमी झाले होते. दुसरीकडे या घटनेनंतर अपघातग्रस्त रेल्वेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आयईडी स्फोटात जाफर एक्सप्रेस ट्रेनच्या उलटलेल्या डब्यांमधून प्रवाशांना वाचवताना दिसत आहेत. या घटनेमुळे रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.