पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 06:26 IST2025-07-24T06:26:03+5:302025-07-24T06:26:17+5:30

पर्वतानेनी हरीश म्हणाले की, जो देश शेजारधर्म व आंतरराष्ट्रीय संबंधांच्या तत्त्वांना हरताळ फासून दहशतवादाला खतपाणी घालतो, त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली पाहिजे.

Pakistan is a radical country mired in terrorism; India delivered strong words at the Security Council meeting | पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

संयुक्त राष्ट्रे :  पाकिस्तान हा देश कट्टरपंथी असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) सातत्याने कर्जे घेण्याची नामुष्की त्याच्यावर आली आहे, अशी टीका भारताने केली आहे. सीमेच्या पलीकडून दुसऱ्या देशात दहशतवादी कारवाया करणाऱ्या देशांना त्याची अतिशय मोठी किंमत चुकवावी लागली पाहिजे, असेही भारताने म्हटले.

सध्या पाकिस्तान हा १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेचा २०२५-२६ कालावधीसाठी अस्थायी सदस्य आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री इशाक दार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत बहुपक्षीय सहकार्य व शांततामय मार्गाने वादांवर तोडगा काढणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करणे या विषयावरील खुल्या चर्चासत्रात भारताने ही मते व्यक्त केली.

पाकिस्तानने या चर्चासत्रात जम्मू-काश्मीर, सिंधू जलवाटप कराराचा मुद्दा उपस्थित केला. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलवाटप करार तात्पुरता स्थगित केला आहे. पाकिस्तान जोवर सीमेपलीकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणे थांबवत नाही तोवर हा करार स्थगित राहील, अशी ठाम भूमिका भारताने घेतली. या चर्चेत तुर्कस्थाननेही जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. 
भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरुपी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी सांगितले की, भारतीय उपखंडात एकीकडे भारत हा लोकशाही देश, त्याची विकसित होत असलेली अर्थव्यवस्था, तर दुसरीकडे कट्टरतावाद, दहशतवादात बुडालेला पाकिस्तान, असे विरोधाभासी चित्र आहे. (वृत्तसंस्था) 

पाकसाठी भारताने हवाई हद्दबंदी आणखी वाढवली
केंद्र सरकारने पाकिस्तानच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द आणखी एका महिन्यासाठी म्हणजे २४ ऑगस्टपर्यंत बंद केली आहे. २६ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ३० एप्रिलपासून पाकिस्तानी विमान कंपन्या, त्यांच्याकडून भाड्याने घेतलेल्या किंवा चालवलेल्या तसेच लष्करी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेशबंदी केली होती.

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करणारी नोटीस टू एअरमन (एनओटीएएम) २३ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही बंदी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आणि धोरणात्मक विचारानुसार ठेवण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

‘पाकिस्तानने इतरांना नैतिकतेचे धडे देऊ नये’
पर्वतानेनी हरीश म्हणाले की, जो देश शेजारधर्म व आंतरराष्ट्रीय संबंधांच्या तत्त्वांना हरताळ फासून दहशतवादाला खतपाणी घालतो, त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली पाहिजे. त्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाला नैतिकतेचे धडे देऊ नये. 

Web Title: Pakistan is a radical country mired in terrorism; India delivered strong words at the Security Council meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.