पाकिस्तानातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारपासून संततधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना घडल्या असून, यात ४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक बेपत्ता झाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकव्याप्त काश्मीरमध्ये गुरुवारी रात्री ढगफुटीची घटना घडली आहे. ढगफुटीमुळे पुर आल्याने ८ लोकांचा मृत्यू झाला असून, शेकडो पर्यटक अडकले आहेत. ढगफुटी आणि पुरामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचे मृतदेह मिळाले असून, एका मुलीचा शोध सुरू आहे.
मुजफ्फराबाद, नीलम बाग, नीलम खोरे आणि झेलम खोऱ्यातील जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुराचा तडाखा बसलेल्या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नीलम बाग जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचशे पर्यटक नीलम खोऱ्यातील एका शिबिरामध्ये अडकले आहेत.
पख्तुनव्वा प्रांतात ३३ लोकांचा मृत्यू
खैबर पख्तुनव्वा प्रांतातही काही ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. ढगफुटीमुळे आलेल्या पुरात पाच जणांचा मृत्यू झाला असून, ४ जण जखमी झाले आहेत. बाजोर जिल्ह्यातही सालारजई तालुक्यात ढगफुटी आणि वीज कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला. तीन जण जखमी झाले आहेत.
उपायुक्त शाहीद अली यांनी सांगितले की, आतापर्यंत १६ मृतदेह मिळाले आहेत. तीन जणांना खार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मनसेहरा परिसरात अचानक पूर आल्याने एक कार वाहून गेली. ज्यात दोन लोकांचा मृत्यू झाला.