"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:15 IST2025-11-11T16:14:27+5:302025-11-11T16:15:00+5:30
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात एक कार जळताना दिसते. कमीत कमी ६ किमी परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकायला मिळाला असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे

"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण?
इस्लामाबाद - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे कोर्टाच्या बाहेर झालेल्या आत्मघाती स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास झालेल्या या स्फोटात १२ लोक मारले गेले. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झालेत. हा स्फोट जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या मुख्य इमारतीबाहेर घडला. जिथे आत्मघातकी हल्लेखोराने वाहन उडवले. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओत जळणारी कार आणि चहुबाजूने धूर पसरल्याचे दिसून येते. या स्फोटामुळे कोर्ट परिसरात गोंधळ माजला. घटनास्थळी पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाने परिसराला तातडीने वेढा घातला होता.
या आत्मघातकी स्फोटानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी याला पाकिस्तानसाठी 'वेक अप कॉल' असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, आपण युद्धाच्या स्थितीत आहोत. आजचा आत्मघाती हल्ला हा अशा लोकांचा भ्रम तोडण्यासाठी आहे ज्यांना वाटते की पाकिस्तानी सैन्य हे युद्ध फक्त अफगाण-पाक सीमेवर किंवा बलुचिस्तानच्या दुर्गम भागात लढत आहे. दहशतवादी आता शहरी भागात पुन्हा डोके वर काढू लागलेत. त्यामुळे आता तालिबानशी चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही असं त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात एक कार जळताना दिसते. कमीत कमी ६ किमी परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकायला मिळाला असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. जसं मी माझी कार पार्किंग केली आणि तिथून कोर्ट परिसरात प्रवेश केला तसं गेटवर जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे लोक सैरावैरा पळू लागले. या घटनेमुळे पार्किंगला उभ्या असणाऱ्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी या आत्मघाती हल्ल्यात जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुरुवातीच्या तपासात हल्लेखोरांना कोर्टाच्या आत प्रवेश करण्यापासून रोखले, सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना रोखल्याने गेटवर स्फोट घडवण्यात आला. या स्फोटामुळे अनेक गाड्या जळाल्या.