Pakistan Imran Khan: इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात; कोण होणार पुढील पंतप्रधान? तीन नावे टॉपवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 15:08 IST2022-04-01T15:06:58+5:302022-04-01T15:08:32+5:30
Pakistan Imran Khan: इम्रान खान यांना सत्ता वाचवण्यासाठी 342 पैकी 172 मतांची गरज आहे. मात्र, विरोधकांचा दावा आहे की, त्यांच्याकडे 175 खासदारांचा पाठिंबा असून पंतप्रधानांनी तातडीने राजीनामा द्यावा.

Pakistan Imran Khan: इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात; कोण होणार पुढील पंतप्रधान? तीन नावे टॉपवर...
इस्लामाबाद:पाकिस्तानमध्ये(Pakistan) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पंतप्रधानइम्रान खान (Imran Khan) यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे, त्यावर येत्या रविवारी निर्णय होणार आहे. इम्रान खान आपली सत्ता टिकवण्यात यशस्वी होणार का पाकिस्तानची सत्ता दुसऱ्या कुणाच्या हातात जाणार, हे लवकर कळेल. दरम्यान, इम्रान खान यांची सत्ता गेल्यास, त्यांच्या जागी कोण येणार, याची उत्सुकता लागली आहे. या शर्यतीत तीन नावे आघाडीवर आहेत.
इम्रान खान यांनी गुरुवारी देशाला संबोधित करताना आपण राजीनामा देणार नसून शेवटच्या चेंडूपर्यंत लढणार असल्याचे स्पष्ट केले. इम्रान खान यांना खुर्ची वाचवण्यासाठी 342 पैकी 172 मतांची गरज आहे. मात्र, विरोधकांचा दावा आहे की, त्यांना 175 खासदारांचा पाठिंबा असून पंतप्रधानांनी तातडीने राजीनामा द्यावा. आता अशा परिस्थितीत इम्रान खान पंतप्रधानपदावरुन पायउतार झाले तर त्यांची जागा कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शाहबाज शरीफ- पंजाब प्रांताचे माजी मुख्यमंत्री, पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (पीएमएल-एन) चे सह-अध्यक्ष आणि नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांना पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी सर्वोच्च पदासाठी नामांकन दिले आहे. शाहबाज हे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत. शरीफ हे अडीच दशकांहून अधिक काळापासून राजकारणात आहेत आणि त्यांनी तीन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे, ज्यामुळे ते प्रांताचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत.
मरियम नवाज- नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज 2012 मध्ये शाहबाज शरीफ यांच्या परवानगीने राजकारणात आली होती. ती इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पीटीआय सरकारवर सातत्याने टीका करत आली आहे. जुलै 2018 मध्ये तिला एव्हनफिल्ड प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दंडासह सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, 19 सप्टेंबर रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली.
बिलावल भुट्टो - पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचा मुलगा, बिलावल पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चा अध्यक्ष आहे. त्यांनी इम्रान खान यांच्यावर अविश्वास प्रस्तावातून पळ काढल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत बिलावल यांचेही नाव आघाडीवर आहे.