कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:21 IST2025-09-30T16:20:25+5:302025-09-30T16:21:39+5:30
Pakistan IMF Loan: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा IMF कडे कर्जाची मागणी केली आहे.

कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
Pakistan IMF Loan: गरीबी, उपासमारी आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) समोर कर्जासाठी हात पसरले आहेत. पाकिस्तानला कर्ज द्यायचे की नाही, हे ठरवण्यासाठी IMF चे पथक पाकिस्तानमध्ये दोन आठवडे थांबेल आणि पाकच्या आर्थिक सुधारणेचे अवलोकन करेल. पथकाला सुधारणा दिसल्या, तरच IMF पाकिस्तानला नवीन कर्ज दिले जाईल.
पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनच्या वृत्तानुसार, IMF ने मंगळवारी (३० सप्टेंबर २०२५) पाकिस्तानला ७ अब्ज डॉलर्सचे कर्ज आणि १.१ अब्ज डॉलर्सची अतिरिक्त रक्कम देण्यासंदर्भात पाकिस्तानच्या आर्थिक पथकासोबत औपचारिक बैठक घेतली. या बैठकीत IMF मिशनच्या प्रमुख ईवा पेत्रोव्हा आणि पाकिस्तानचे वित्तमंत्री मोहम्मद औरंगजेब याच्यासह स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर, वित्त सचिव आणि संघीय महसूल मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.
रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारने IMF मिशनला सांगितले की, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा विचार केला जावा. मात्र, सध्याची समीक्षा बैठक पुराच्या आधीच्या लक्ष्यांवर आधारित आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार जून २०२५ पर्यंतच्या कामगिरीसाठी जबाबदार राहणार आहे. IMF ने आधी दिलेली लक्ष्ये पूर्ण केली असतील, तरच पाकिस्तानला कर्जाची पुढील रक्कम दिली जाईल. ही बैठक सकारात्मक ठरली, तर पाकिस्तान पुढील महिन्यात सुमारे १ अब्ज डॉलरच्या वितरणासाठी पात्र होईल.