पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:31 IST2025-08-14T12:21:33+5:302025-08-14T13:31:20+5:30
Pakistan Rocket Force: पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही घोषणा केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून जेवढी वर्षे झाली तेवढीच पाकिस्तानला झाली आहेत.

पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
भारताकडून ऑपरेशन सिंदूरवेळी सपाटून मार खाल्ल्याने पाकिस्तानला रहावत नाहीय. गेल्या महिन्यात पाकिस्तानने शाहीन-३ मिसाईलची दोन-तीनदा चाचणी केली. परंतू, ते भरकटले आणि दुसरीकडेच जाऊन पडले. अशा परिस्थितीत पाकिस्तानने १४ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी रॉकेट फोर्स उभारण्याची घोषणा केली आहे. एक मिसाईल साधे उडविता येत नाही आणि हा पाकिस्तान चीनसारखी अख्खी रॉकेट फोर्स बनविण्याच्या बाता मारू लागला आहे.
पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ही घोषणा केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून जेवढी वर्षे झाली तेवढीच पाकिस्तानला झाली आहेत. परंतू, पाकिस्तानने भारताचा दु:स्वास करून अमेरिकेच्या साथीने युद्धे लादली आणि आपल्या जनतेला वाऱ्यावर, उपाशी सोडून दहशतवाद्यांना पोसण्यातच धन्यता मानली. आज भिकेला लागला तरीही पाकिस्तान काही सुधरलेला नाही. पाकिस्तानी लष्कराला भारताविरोधात लढण्यासाठी सक्षम करणे आणि दहशतवाद्यांना पोसणे हेच त्यांनी हित मानलेले आहे.
शरीफ यांनी रॉकेट फोर्सची स्थापना केल्याची घोषणा केली आहे. रॉकेट फोर्स आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि प्रत्येक दिशेने शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम असल्याच्या बाताही त्यांनी मारल्या आहेत. पाकिस्तानची सर्व मिसाईल या चीनच्याच बनावटीच्या आहेत. ज्यांना भारताने दोन महिन्यांपूर्वीच पाणी पाजले आहे.
पाकिस्तानकडे आहेत या मिसाईल...
पाकिस्तानी सैन्याकडे सध्या ४०० किमी रेंजची एसएसएम फतेह-२ मिसाईल, ४५० किमी आणि ७०० किमीच्या रेंजसह फतेह-३ आणि फतेह-४ मिसाईल आहे. शाहीन मिसाईलही आहेत. चीनने दिलेली मिसाईल देखील आहेत. परंतू, त्यांचा वापर पाकिस्तानला करताच आलेला नाहीय. यामुळे ती भारताविरोधात कितपत यशस्वी होतील हे एक गूढच आहे. दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानने डागलेल्या मिसाईल भारताने आकाशातच उध्वस्त करून टाकल्या होत्या. एक मिसाईल तर त्यांचे जिवंत सापडले होते. ते देखील चीनने दिलेले होते. या चार दिवसांच्या लढाईत पाकिस्तानच नाही तर चीन आणि तुर्कीची देखील पुरती नाचक्की भारताने करून टाकली होती.