पाकिस्तान हादरले! अज्ञात हल्लेखोरांनी उडवून दिली गॅस पाईपलाईन; क्वेटासह ५ जिल्ह्यांचा पुरवठा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 10:58 IST2026-03-31T10:58:08+5:302026-03-31T10:58:30+5:30
Pakistan Gas Pipeline Explosion: पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात मुख्य गॅस पाईपलाईनवर बॉम्बस्फोट करण्यात आला आहे. क्वेटासह अनेक जिल्ह्यांत गॅस टंचाई निर्माण झाली असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.

पाकिस्तान हादरले! अज्ञात हल्लेखोरांनी उडवून दिली गॅस पाईपलाईन; क्वेटासह ५ जिल्ह्यांचा पुरवठा ठप्प
आर्थिक आणि राजकीय संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आता दहशतवादी हल्ल्याचा मोठा फटका बसला आहे. बलूचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटाच्या बाहेरील भागात अज्ञात हल्लेखोरांनी मुख्य नॅचरल गॅस पाईपलाईन बॉम्बस्फोटाने उडवून दिली आहे. या भीषण स्फोटामुळे क्वेटासह आजूबाजूच्या पाच जिल्ह्यांचा गॅस पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.
स्फोटाचा थरार
'सुई सदर्न गॅस कंपनी'च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ इंच व्यासाची ही मुख्य पाईपलाईन अख्तराबाद वेस्टर्न बायपासजवळ उडवण्यात आली. स्फोट इतका भीषण होता की आगीच्या ज्वाळा लांबून दिसत होत्या. या हल्ल्यामुळे हझारा टाऊन, पश्तून बाग यांसारख्या शहरांतर्गत भागांसह मस्तुंग, कलात, पिशिन आणि झियारत जिल्ह्यांत घरगुती आणि व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प झाला आहे.
कोणी केला हल्ला?
अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, बलूचिस्तानमध्ये सक्रिय असलेले फुटीरतावादी गट यापूर्वीही गॅस पाईपलाईन आणि सरकारी मालमत्तांना लक्ष्य करत आले आहेत. स्थानिक नैसर्गिक संसाधनांवर केंद्र सरकारचा ताबा असल्याच्या रागातून हे हल्ले केले जातात.
दुरुस्तीचे काम सुरू
घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून तांत्रिक पथक पाईपलाईन दुरुस्तीच्या कामात गुंतले आहे. रमजानच्या काळात गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.