'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:06 IST2025-08-29T16:05:46+5:302025-08-29T16:06:35+5:30
Pakistan Floods: पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

'भारताने पाणी सोडले म्हणून मृतदेह वाहत आले...', पाकिस्तानी मंत्र्याने पुन्हा गरळ ओकली
Pakistan Floods: सध्या उत्तर भारतात पावसाने थैमान घातले आहे. अनेक जम्मू-काश्मी, उत्तराखंडसारख्या राज्यांमध्ये अनेक नद्यांना महापूर आला आहे. भारतासह पाकिस्तानातील पंजाब, सियालकोटमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, अडीच लाख लोक विस्थापित झाले आहेत. सुमारे १,४३२ गावे पुरामुळे बाधित आहेत. पिके उद्ध्वस्त झाली असून, व्यवसाय ठप्प झाले आहेत. मात्र, अशा कठीण काळातही पाकिस्तान भारताविरोधात गरळ ओकतोय.
पूरग्रस्त सियालकोटच्या दौऱ्यात संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एक विचित्र विधान केले. त्यांच्या मते, भारताकडून सोडण्यात आलेल्या पुराच्या पाण्याने मृतदेह, गुरे आणि कचऱ्याचा ढीग पाकिस्तानात आला आहे. या ढिगाऱ्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या मदत कार्यात अडथळा येत आहे. आसिफ पुढे म्हणाले की, सियालकोट हे जम्मूमधून निघणाऱ्या जलमार्गांच्या खाली आहे. जेव्हा जेव्हा भारत पाणी सोडतो, तेव्हा तिथे नियमित पूर येतो. मात्र, आसिफ यांनी हे देखील कबूल केले की नद्यांमध्ये पाणी सोडण्यापूर्वी भारताने पाकिस्तानला दोनदा माहिती दिली होती.
सोशल मीडियावर ट्रोल
ख्वाजा आसिफ यांचे हे विधान पाकिस्तानी सोशल मीडियावर व्हायरल झाले. लोकांनी त्यांच्यावर टीका केली की, सरकार त्यांच्या तयारी आणि पायाभूत सुविधांच्या अपयशापासून लक्ष हटविण्यासाठी भारतावर आरोप करत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तानी मंत्र्याने अजब दावा केला आहे.
पाकिस्तानात ऐतिहासिक पूर
पाकिस्तानी पाटबंधारे विभागाच्या मते, ३८ वर्षांत प्रथमच रावी, सतलज आणि चिनाब नद्या एकाच वेळी तुडूंब भरुन वाहत आहेत. यामुळे बचाव कार्य अधिक कठीण झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सैन्य आणि मदत कर्मचारी चोवीस तास काम करत आहेत.