भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 22:11 IST2025-05-08T22:11:21+5:302025-05-08T22:11:59+5:30
India Pakistan War, Missile Drone Attack Location: भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच सर्व क्षेपणास्त्रे नष्ट केली. कोणत्याही क्षेपणास्त्रांना हल्लाची संधी मिळू दिली नाही.

भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
India Pakistan War, Missile Drone Attack Location: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे निराश झालेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गुरुवारी पहाटे पाकिस्तानने जम्मू आणि पठाणकोटसह अनेक संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्यानंतर दिवसभरात भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली. त्यानंतर आज संध्याकाळपासून पाकिस्तानने पुन्हा हल्ला करण्यात सुरुवात केली. पाकिस्तानने एकाच वेळी आठ क्षेपणास्त्रांनी जम्मू नागरी विमानतळ, सांबा, आरएस पुरा, अर्निया आणि आसपासच्या परिसरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच सर्व क्षेपणास्त्रे नष्ट केली. कोणत्याही क्षेपणास्त्रांना हल्लाची संधी मिळू दिली नाही.
कुपवाडामध्ये जोरदार गोळीबार
क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान जम्मूच्या अखनूर भागात युद्धाच्या सायरनचे आवाज ऐकू आले. त्याच वेळी, काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सीमेपलीकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. निवासी भागांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. तथापि, भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण जम्मू प्रदेशात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
पठाणकोट एअरबेसवरील हल्लाही अयशस्वी
पाकिस्तानने जम्मूसह पठाणकोट एअरबेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथेही भारतीय हवाई संरक्षण दलाने त्यांचे मनसुबे उधळून लावले. पठाणकोटसारख्या संवेदनशील लष्करी तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न हेच दर्शवितो की पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारताला चिथावणी देऊ इच्छित आहे. परंतु भारतीय सैन्यदल सज्ज असल्याने पाकिस्तानचे सर्व कट वेळीच उधळून लावण्यात आले आहेत.
२४ तासांत दुसरा अयशस्वी हल्ला
ऑपरेशन सिंदूरनंतर २४ तासांत पाकिस्तानकडून दुसऱ्यांदा अयशस्वी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानच्या सैन्याची कमकुवत बाजू उघडकीस आणली. त्यांची निराशा त्यांच्या मानसिकतेतून दिसून येते आहे. आता भारतीय लष्कराने सीमेवर देखरेख वाढवली आहे आणि कोणताही नवीन हल्ला रोखण्यासाठी ते पूर्णपणे सतर्क आहेत. भारत पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे.