हाफिज सईदला 'सोशल' झटका, फेसबुकने केली ही कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 13:03 IST2018-07-15T12:25:58+5:302018-07-15T13:03:51+5:30
मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला फेसबुकनं जोरदार झटका दिला आहे.

हाफिज सईदला 'सोशल' झटका, फेसबुकने केली ही कारवाई
इस्लामाबाद - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला फेसबुकनं जोरदार झटका दिला आहे. फेसबुकने हाफिस सईदच्या पक्षाचं फेसबुक पेज डिलीट केले आहे. महत्त्वाचे म्हणजे हाफिजच्या पक्षाच्या उमेदवारांचे आणि त्याच्या पक्षाशी संबंधित अन्य फेसबुक पेजेही डिलीट करण्यात आले आहेत. यामुळे ऐन निवडणुकीत हाफिज सईदला मोठा झटका बसला आहे.
'एक्सप्रेस ट्रिब्यून'नं यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 'फेसबुकनं त्यांच्याच धोरणांचं उल्लंघन केले आहे. आमच्यावर फेसबुकने अन्याय केला आहे,' अशा पद्धतीनं ओरड सध्या मिली मुस्लिम लीग करत आहे. मात्र ही कारवाई का करण्यात आली आहे?, याबाबतचे कारण अद्याप फेसबुककडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
(काश्मीर खोऱ्यातील हिंसा म्हणजे नव्या युगाची पहाट- हाफिज बरळला)
25 जुलैला पाकिस्तानात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर हाफिजच्या पक्षावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्यानं अल्लाह-ओ-अकबर तहरीक नावाने नवा राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे केले आहेत. मात्र निवडणुकीपूर्वीच फेसबुकनं हाफिज सईदला सोशल दणका दिला आहे.