पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 13:25 IST2025-05-04T13:22:05+5:302025-05-04T13:25:46+5:30

अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानकडे भारताशी लढण्यासाठी दारूगोळा नसल्याचे समोर आलं आहे.

Pakistan does not have ammunition to fight India country will not be able to survive even for 4 days | पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान

पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान

India-Pak Tension: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. भारताला इशारा देण्यासाठी पाकिस्तान क्षेपणास्त्र चाचण्या करुन त्यांचे सैन्य मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्यक्षात जर भारताबरोबर युद्ध झाल्यास चार दिवस टिकून राहण्यासाठीही पाकिस्तानकडे पुरेसा दारूगोळा शिल्लक नाही. युद्ध झाल्यास पाकिस्तान चार दिवसात भारतासमोर गुडघे टेकेल अशी परिस्थिती असल्याची माहिती एका गुप्तचर अहवालातून समोर आली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र अनेक अहवालांमध्ये असा दावा केला जातोय की जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर पाकिस्तान भारताविरुद्ध जास्त काळ टिकू शकणार नाही. विशेष म्हणजे पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनीही हे मान्य केले आहे. पाकिस्तानकडे आता युद्ध लढण्यासाठी फक्त चार दिवसांचा दारूगोळा शिल्लक आहे. युक्रेन आणि इस्रायलला मोठ्या प्रमाणात दारूगोळा पुरवल्यामुळे पाकिस्तानवर हे संकट उद्भवले आहे.

२०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने शस्त्रास्त्र निर्यातीचा मार्ग निवडला होता. पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीने लाखो तोफखाना, रॉकेट आणि लहान शस्त्रे युक्रेनला पाठवली होती. फेब्रुवारी आणि मार्च २०२३ मध्येच ४२,००० बीएम-२१ रॉकेट, ६०,००० १५५ मिमी हॉवित्झर शेल आणि १,३०,००० इतर रॉकेट निर्यात करण्यात आले. यातून पाकिस्तानने सुमारे ३६४ दशलक्ष डॉलर्स कमावले, ज्याचा मोठा भाग लष्कराच्या मुख्यालयाला मिळाला होता.

पाकिस्तानी सैन्याला आता १५५ मिमी तोफखान्यांच्या तीव्र कमतरतेचा सामना करावा लागत आहे. पुरेशा दारूगोळ्याशिवाय एसएच-१५ सारख्या माउंटेड गन सिस्टीम निरुपयोगी ठरत आहेत. आर्थिक फायद्यासाठी पाकिस्तानने युक्रेन आणि इस्रायलला मोठ्या प्रमाणात तोफखाना दारूगोळा निर्यात केला. त्यामुळे सध्याच्या साठ्यातून पाकिस्तान फक्त ४ दिवस युद्ध लढू शकेल. दुसरीकडे, आर्थिक मंदी, महागाई आणि इंधन टंचाईमुळे लष्कराला सराव थांबवावा लागला आहे.

दरम्यान, पाकिस्तान अणुहल्ल्याच्या धमक्या देत असला तरी प्रत्यक्षात त्यांची परिस्थिती खूपच वाईट असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळेच पाकिस्तान सरकार वारंवार भारताला आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तटस्थ आणि संयुक्त चौकशीसाठी तयार असल्याचे म्हणत आहे.

Web Title: Pakistan does not have ammunition to fight India country will not be able to survive even for 4 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.