पाकिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटानं हादरला, 22 जणांचा मृत्यू
By Admin | Updated: March 31, 2017 16:44 IST2017-03-31T16:43:40+5:302017-03-31T16:44:01+5:30
पाकिस्तानच्या वायव्य भागात एका बाजारात दहशतवाद्यानं आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला

पाकिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटानं हादरला, 22 जणांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
पेशावर, दि. 31 - पाकिस्तानच्या वायव्य भागात एका बाजारात दहशतवाद्यानं आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. शिया इमामबर्ग या आदिवासीबहुल भागात हा बॉम्बस्फोट झाला आहे. पराचिनारमधील सेंट्रल बाजारातील इमामबर्गच्या मुख्य प्रवेशद्वारावर कारमधून एक दहशतवादी आला आणि त्यानं आत्मघाती बॉम्बस्फोट घडवला आहे.
या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक जण जखमी असल्याची माहिती डॉननं दिली आहे. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. या बॉम्बस्फोटात गाड्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र या हल्ल्याची अद्यापही कोणी जबाबदारी स्वीकारली नाही.
सुरक्षा दलानं बचावकार्यासाठी बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी आपत्कालीन पथक पाठवलं आहे. पाकिस्तान सरकारनं बॉम्बस्फोट झालेल्या परिसरातील सर्व रुग्णालयांसाठी आणीबाणी जाहीर केली आहे. लष्कराच्या वैद्यकीय पथकानं जखमींना तात्काळ हेलिकॉप्टरनं पराचिनार भागातून हलवलं असून, रुग्णालयात दाखल केलं आहे, अशी माहिती आंतर सेवा जनसंपर्क विभागानं दिली आहे. तसेच या दहशतवादी हल्ल्याची पंतप्रधान नवाज शरीफ यांनी निंदा केली आहे. दहशतवादाविरोधात लढणं ही आपली जबाबदारी असल्याचंही नवाज शरीफ म्हणाले आहेत.