"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:46 PM2024-05-22T12:46:15+5:302024-05-22T13:04:54+5:30

पाकिस्तानचे स्थायी राजदूत मुनीर अक्रम यांनी नवा भारत धोकादायक आहे म्हणत ते टार्गेट किलिंग करत असल्याचे म्हटलं आहे.

Pakistan Ambassador Munir Akram at United Nations targeted India over target killing | "हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी

"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी

Pakistan Ambassador : लोकसभा निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. भाजप नेत्यांकडून पाकिस्तानातील परिस्थितीची उदाहरणं दिली जात आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रचारसभांमध्ये घरात घुसून आम्ही दहशतवाद्यांना ठार मारतो, अशी विधाने केली होती. त्यानंतर आता पाकिस्तानकडून यावर प्रतिक्रिया आली आहे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी टार्गेट किलिंगवरून भारतावर निशाणा साधला आहे. नवीन भारत इतरांच्या घरात घुसून तुम्हाला मारत आहे, असे मुनीर अक्रम यांनी म्हटलं. तसेच पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत आणि ते अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे, असेही अक्रम म्हणालेत.

पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये होत असलेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांवरून अक्रम यांनी भारताला लक्ष्य केले. संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना अक्रम यांनी अमेरिकन दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा हवाला दिला आणि भारतावर निशाणा साधला. कॅनडातील खलिस्तानी हरदीपसिंग निज्जर याच्या व्यतिरिक्त भारत सरकारने परदेशी भूमीवर राहणाऱ्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या टार्गेट किलिंगच्या घटना घडवून आणल्या आहेत, असे अक्रम यांनी म्हटलं.

"पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुरक्षा परिषद, सरचिटणीस आणि महासभेच्या अध्यक्षांना पाकिस्तानमधील टार्गेट किलिंगच्या घटनांविरोधात भारताच्या मोहिमेची माहिती दिली आहे. मात्र, हे केवळ पाकिस्तानपुरते मर्यादित नाही. यामध्ये कॅनडातील राजकीय विरोधकांच्या हत्यांचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्रे आणि शक्यतो इतर देशांमध्येही हा प्रयत्न केला गेला आहे. नवा भारत हा धोकादायक आहे, तो सुरक्षित ठेवत नाही तर असुरक्षित करतो," असे अक्रम यांनी म्हटलं.

दुसरीकडे, अक्रम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचाही संदर्भ दिला. हे लोक इतके घाबरले आहेत की त्यांना स्वप्नातही पाकिस्तानचे अणुबॉम्ब दिसतात. असे सरकार आणि नेते देश चालवू शकतात का?, असे पंतप्रधान मोदी एक सभेत म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देताना अक्रम यांनी पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत आणि ते अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे, असं म्हटलं. 

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना अज्ञातांनी संपवले होते. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनने एका वृत्तात दावा केला होता की, भारत सरकारने परदेशी भूमीवर राहणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाकिस्तानमध्ये हत्या केल्या आहेत.

Web Title: Pakistan Ambassador Munir Akram at United Nations targeted India over target killing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.