युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; तीन दहशतवाद्यांना ‘शांतिदूत’ म्हणून काबूलला पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:52 IST2026-03-11T13:51:45+5:302026-03-11T13:52:07+5:30
Pakistan-Afghanistan Crisis: मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे.

युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; तीन दहशतवाद्यांना ‘शांतिदूत’ म्हणून काबूलला पाठवले
Pakistan-Afghanistan Crisis: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने तीन कुख्यात दहशतवाद्यांना ‘शांतिदूत’ म्हणून काबूलला पाठवल्याची माहिती समोर आली आहे. फजलुर रहमान खलील, अब्दुल्ला शाह मजहर (पीर मजहर शाह) आणि कारी साजिद उस्मान अशी या तिघांची नावे आहेत.
माध्यमांच्या वृत्तानुसार, या तिघांना तालिबानच्या सर्वोच्च नेत्यांशी चर्चा करून युद्धविरामासाठी फतवा जारी करण्यासाठी काबूलला पाठवण्यात आले आहे. मात्र पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्ताची अधिकृत पुष्टी केलेली नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने या तिघांना धार्मिक नेते असल्याचे सांगितले असून, त्यांच्याबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
दोन दिवसांपासून काबूलमध्ये उपस्थित
फजलुर रहमान खलील, अब्दुल्ला शाह मजहर आणि कारी साजिद उस्मान हे गेल्या दोन दिवसांपासून काबूलमध्ये आहेत. हे तिघेही पूर्वी पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) मध्ये सक्रिय होते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना त्यांना काबूलला पाठवण्यात आल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कोण आहेत हे तिघे?
1. फजलुर रहमान खलील
फजलुर रहमान खलील हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय राहिलेला दहशतवादी आहे. १९८० च्या दशकात त्याला हरकत-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख बनवण्यात आले होते. खलील हा खैबर पख्तूनख्वाह प्रांतातील रहिवासी असून, त्याला एकेकाळी कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनचा निकटवर्तीय मानले जात होते. सध्या तो पीओकेमधील दोन मदरशांचा प्रमुख असून तिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते, अशी माहिती आहे.
2. अब्दुल्ला शाह मजहर (पीर मजहर शाह)
अब्दुल्ला शाह मजहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा निकटवर्तीय मानला जातो. तोही पीओकेमध्ये दहशतवादी कारवायांचे संचालन करत असल्याचे सांगितले जाते. सध्या तो ‘तहरीक-ए-गल्बा-ए-इस्लाम’ या राजकीय संघटनेचा प्रमुख आहे. तालिबानमध्ये त्याचा प्रभाव असल्यामुळे त्याला चर्चेसाठी काबूलला पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
3. कारी साजिद उस्मान
कारी साजिद उस्मान हा आपल्या भावाच्या प्रभावाखाली दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला. त्याचा भाऊ साजिद याने सोव्हिएत संघाविरुद्ध तालिबानसाठी जिहाद मोहिमेचे नेतृत्व केले होते. कारी उस्मान पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये सक्रिय राहिला आहे. तालिबानशी असलेल्या जुन्या संबंधांमुळे त्यालाही काबूलमध्ये पाठवण्यात आले आहे.
पाकिस्तानची रणनीती काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने चीन, कतार, सौदी अरेबिया आणि तुर्की यांच्या मदतीने तालिबान सरकारशी युद्धविरामाबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या चर्चांमध्ये कोणतीही ठोस प्रगती झाली नाही. पाकिस्तानची इच्छा आहे की तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्लाह अखुंदझादा पाकिस्तानविरोधी दहशतवादी कारवायांवर बंदी घालणारा फतवा जारी करतील. मात्र तालिबानने हा प्रस्ताव फेटाळून लावला असून पाकिस्तानातील दहशतवाद हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले आहे.
आर्थिक दबावामुळे पाकिस्तानची घाई
सध्या पाकिस्तानवर आर्थिक दबाव वाढला आहे. शेजारी देश इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे प्रादेशिक परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान कोणत्याही मार्गाने संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.