India-Pakistan Tension: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २६ निष्पाप पर्यटकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष वाढला आहे. या हल्ल्यासाठी जो जबाबदार असेल त्याला जगाच्या कोपऱ्यातून शोधून काढू असं सांगत भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याशिवाय पाकिस्तानविरोधात मोठमोठे निर्णय घेत सैन्यालाही कारवाईसाठी मुभा दिली आहे. भारत पुढच्या २४ ते ३६ तासांत पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याचा दावा पाकचे मंत्री करत आहेत. त्यात बुधवारी रात्री दोन्ही देशांतील तणाव पाहता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पुढाकार घेतला.
रुबियो यांनी मध्यरात्री भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा करत युद्ध टाळण्याचं आवाहन केले. दोन्ही देशांनी संयम पाळावा असा सल्ला अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानला दिला आहे. दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत आहे असं आश्वासन रुबियो यांनी जयशंकर यांना दिले. मार्को रुबियो यांनी भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी वेगवेगळी चर्चा केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेने दु:ख व्यक्त केले. दहशतवादाविरोधात अमेरिका भारताला साथ देईल असं रुबियो यांनी आश्वासन दिले.
त्याशिवाय रुबियो यांनी पाकिस्तानसोबत मिळून तणाव कमी करणे आणि दक्षिण आशियात शांतता, सुरक्षा कायम राखण्याच्या भारताच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. दुसरीकडे पाकिस्तानला फोन करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या हल्ल्याच्या चौकशीत सहकार्य करावे. दक्षिण आशियातील शांतता, सुरक्षा कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानने चर्चा करावी असं रुबियो यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना परिस्थितीचा आढावा दिला. भारत पाकिस्तानला उकसावत असल्याचा आरोप त्यांनी अमेरिकेकडे केला. अमेरिकेने भारतावर दबाव आणावा अशी मागणी पाकिस्तानने केली. सिंधु जल करारावरही अमेरिकेसोबत चर्चा केली. या करारानुसार मिळणाऱ्या पाण्यावर पाकिस्तानातील २४ कोटी लोकांचं जीवन आहे. करारात कुठल्याही पक्षकाराने एकतर्फी माघार घेणे मान्य नाही असंही पाकिस्तानने अमेरिकेने सांगितले आहे.