Pahalgam Terror Attack: भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर क्वाड देशांच्या (भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी स्थानिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर महत्वाची टिप्पणी केली. 'पहलगाम दहशतवादी हल्ला हा काश्मीरमधील पर्यटन उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने केलेलs आर्थिक युद्ध होते. आम्ही यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, आम्ही पाकिस्तानच्या अणू हल्ल्यांच्या धमक्यांना अजिबात घाबरत नाही. पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवादाला आम्ही योग्य उत्तर देऊ.'
जयशंकर पुढे म्हणतात, 'पहलगाम हल्ला हा आर्थिक युद्ध होते. त्याचा उद्देश अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या काश्मीरमधील पर्यटन नष्ट करणे होता. तसेच, त्याचा उद्देश धार्मिक हिंसाचार भडकवणेदेखील होता. कारण लोकांना मारण्यापूर्वी त्यांना धर्म विचारण्यात आला. म्हणूनच आम्ही निर्णय घेतला की, आम्ही दहशतवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही.'
'भारताविरुद्ध हल्ले करणारे पाकिस्तानस्थित दहशतवादी गुप्तपणेच काम करत नाहीत, तर या दहशतवादी संघटना आहेत, ज्यांचे कॉर्पोरेट मुख्यालय पाकिस्तानच्या दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि निधी देणाऱ्या सरकारलाही आम्ही सोडणार नाही. भारताचा असा विश्वास आहे की दहशतवाद हा खरोखरच सर्वांसाठी धोका आहे. कोणत्याही देशाने त्यांचे धोरणे राबवण्यासाठी दहशतवादाचा वापर करू नये. शेवटी हा सर्वांनाच नुकसान पोहोचवतो,' असेही त्यांनी यावेळी म्हटले.
युद्धविरामात अमेरिकेची भूमिका होती का?जयशंकर यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षा थांबवण्यासाठी मध्यस्थी केली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, 'नाही, मला तसे वाटत नाही. ९ मे रोजी रात्री उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली आणि आपण काही गोष्टी स्वीकारल्या नाहीत, तर पाकिस्तान भारतावर खूप मोठे हल्ले करू शकतो, असे त्यांनी सांगितले.'
'मी तेव्हा तिथेच होतो. पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले होते की, आम्ही पाकिस्तानच्या धमक्यांकडे लक्ष दिले नाही. त्यांनी संकेत दिला की, आमच्याकडून प्रत्युत्तर दिले जाईल. हे काल रात्री घडले आणि त्या रात्री पाकिस्तानी लोकांनी आमच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला, त्यानंतर आम्ही खूप लवकर प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मला फोन केला आणि सांगितले की, पाकिस्तानी चर्चेसाठी तयार आहेत,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.