'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 22:05 IST2025-04-28T22:01:22+5:302025-04-28T22:05:14+5:30
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार घाबरले आहे.

'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान सरकार घाबरले आहे. अशातच, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तावर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. 'भारत कधीही हल्ला करू शकतो. त्यामुळे सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहे. या परिस्थितीत काही राजनैतिक निर्णय घ्यावे लागतील, जे घेतले जात आहेत,' अशी प्रतिक्रिया पाक संरक्षणमंत्र्याने दिली.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ख्वाजा आसिफ म्हणाले, 'पाकिस्तानी लष्कराने भारताच्या हल्ल्याच्या शक्यतेबद्दल सरकारला माहिती दिली आहे. आम्ही आमचे सैन्यही बळकत केले असून, पूर्ण पाकिस्तान अलर्ट मोडवर आहे. आमच्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण झाला, तर आम्ही आमच्या अण्वस्त्रांचा वापर करू.'
पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देश दहशतवादाचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानवर कठोर कारवाईची मागणी करत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेत पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे नाकारला आणि पहलगाममधील 26 जणांच्या हत्येची कोणतीही निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यास ते तयार असल्याचे म्हटले.
भारताची पाकवर कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर राजनैतिक आणि धोरणात्मक पावले उचलली आहेत. भारताने उचललेल्या पावलांमध्ये 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ स्थगित करणे, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांची व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करणे यांचा समावेश आहे.