भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 08:28 IST2025-04-26T07:31:58+5:302025-04-26T08:28:30+5:30
जम्मूच्या सीमेवर पाकने १३ चिनाब रेंजर्स, तर सांबा, कठुआच्या सीमेवर अनुक्रमे १४ व २६ चिनाब रेंजर्सचे अतिरिक्त सैनिक पाकिस्तानने तैनात केले आहेत.

भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
सुरेश एस. डुग्गर
जम्मू - भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने अधिक सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. तेथील अनेक चौक्यांवर असलेल्या पाकिस्तानच्या असलेल्या सैनिकांपेक्षा तिप्पट-चौपट संख्येने त्या देशाचे सैनिक दिसू लागले आहेत.
पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला आहे. भारत कारवाई करणार या भीतीने पाकिस्तानी लष्करानेही सीमेवरील हालचाली वाढविल्या आहेत. जम्मूच्या सीमेवर पाकने १३ चिनाब रेंजर्स, तर सांबा, कठुआच्या सीमेवर अनुक्रमे १४ व २६ चिनाब रेंजर्सचे अतिरिक्त सैनिक पाकिस्तानने तैनात केले आहेत.
पाकिस्तानी लष्कराने आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवर रणगाडे, स्वयंचलित तोफखाना व अन्य शस्त्रास्त्रे मोठ्या प्रमाणावर आणण्यास प्रारंभ केला आहे. आम्ही कोणत्याही संघर्षासाठी सज्ज आहोत असा आव पाकिस्तानने आणला असला तरी भारताने याआधी केलेला सर्जिकल स्ट्राइक व एअर स्ट्राइक यांच्यामुळे पाक लष्कर धास्तावले आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली.