ओसामाकडून कुत्र्यांवर रासायनिक अस्त्रांची चाचणी, मुलाची धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 13:39 IST2022-12-03T13:38:37+5:302022-12-03T13:39:51+5:30
मुलाने दिली माहिती; वडिलांबरोबर घालविले अतिशय वाईट दिवस

ओसामाकडून कुत्र्यांवर रासायनिक अस्त्रांची चाचणी, मुलाची धक्कादायक माहिती
दोहा : अल कायदा या दहशतवादी संघटनेचा तत्कालीन प्रमुख ओसामा बिन लादेन आपल्या पाळीव कुत्र्यांवर रासायनिक अस्त्रांची चाचणी करत असे, अशी धक्कादायक माहिती त्याचा मुलगा उमर याने दिली आहे.
कतार येथे त्याने एका मुलाखतीत सांगितले की, मीदेखील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय व्हावे, अशी ओसामा बिन लादेन याची इच्छा होती; पण मला अशा गोष्टींमध्ये रस नव्हता. अफगाणिस्तानमध्ये आम्ही राहात असताना मला एके ४७ रायफल, तसेच रशियाचा रणगाडा चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. माझ्या वडिलांबरोबर घालविलेले दिवस अतिशय वाईट दिवस होते. (वृत्तसंस्था)
उमरला येतात पॅनिक अटॅक
ओसामा बिन लादेनचा मुलगा उमर याची पत्नी जेनाने सांगितले की, उमर याचे बालपण अतिशय विचित्र वातावरणात गेले आहे. त्या दिवसांची आठवण त्याला आजही नकोशी होते. कधी कधी त्याला पॅनिक अटॅक येतात. आपल्या वडिलांनी इतकी वाईट कृत्ये केली आहेत, यावर त्याचा विश्वास बसत नाही.
उमर आहे उत्तम चित्रकार
उमर हा ४१ वर्षांचा असून, तो चित्रकार आहे. त्याचे एक पेंटिंग ८,५०० पौंड म्हणजे ८ कोटी रुपयांहून अधिक किमतीला विकले गेले होते. तो आपली पत्नी जैना हिच्या सोबत फ्रान्स येथील नाॅर्मंडीमध्ये राहतो. तो सध्या काही कामासाठी कतार येथे आला आहे.
त्याने सांगितले की, मला दहशतवादी कारवायांमध्ये अडकायचे नव्हते. त्यामुळे मी वडिलांपासून दूर झालो. अमेरिकेत न्यूयॉर्क येथे ११ सप्टेंबर २००१ रोजी जे दहशतवादी हल्ले झाले, त्याच्या काही महिने आधी उमर अफगाणिस्तान सोडून दुसऱ्या देशात गेला होता.
अमेरिकेने केला लादेनचा खात्मा
nअल कायदाच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींवर विमाने धडकवली होती. त्यामध्ये ९३ देशांतील २,९७७ लोकांचा मृत्यू झाला होता.
nहा हल्ला ९/११ या नावानेही ओळखला जातो. ओसामा बिन लादेनला अमेरिकी कमांडोंनी पाकिस्तानमध्ये ठार केले.