भारत पाकिस्तानमध्ये गुरुवारच्या रात्री हवेत तुंबळ धुमश्चक्री पहायला मिळाली. पाकिस्तानने पहाटे आणि रात्री ९ च्या सुमारास भारतीय शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनी तो हाणून पाडला. यानंतर भारताने कराची, इस्लामाबादपर्यंत हल्ले चढविले. भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाल्याची चर्चा जगात सुरु झाली. यावर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिका हा भारत-पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही. कारण आमचे ते काम नाही, त्याच्याशी संबंध नाही. आम्ही जे करू शकतो ते हे की, या दोघांना तणाव थोडा कमी करण्यास प्रोत्साहित करू शकतो. परंतू आम्ही युद्धाच्या मध्ये पडणार नाही. जे मुळात आपले काम नाही आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अमेरिकेच्या क्षमतेशी त्याचा काहीही संबंध नाही. अमेरिका भारतीयांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. आम्ही पाकिस्तान्यांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. यामुळे आम्ही राजनैतिक मार्गांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत, असे व्हेन्स म्हणाले.
तसेच आशा आहे की हे एका व्यापक प्रादेशिक युद्धात किंवा, देव करो, आण्विक संघर्षात रूपांतरित होणार नाही. सध्या तरी आम्हाला असे वाटत नाहीय, असे व्हेन्स यांनी सांगितले. दरम्यान, नॉर्वेने दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री देखील आज सकाळी पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे.