पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेपाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूर हल्ल्यात कुख्यात दहशतवादी रौफ असगरचा खात्मा झाल्याची माहिती पुढे आली आहे. ६ मे रोजी रात्री भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करत मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यात मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जणांना यमसदनी धाडले. आता रौफ असगरही हल्ल्यात ठार झाल्याची बातमी आहे.
कोण होता रौफ असगर?
रौफ असगर हा IC-814 प्लेन हायजॅक जे कंदहार प्लेन हायजॅक नावाने ओळखले जाते, या घटनेचा मास्टरमाईंड होता. २४ डिसेंबर १९९९ साली इंडियन एअरलाईन्सची फ्लाईट काठमांडूहून दिल्लीला येत होती. मात्र ५ दहशतवाद्यांनी या विमानाचं अपहरण केले. त्यात १७६ प्रवाशांसह १५ केबिन क्रू सदस्य होते. भारतीय इतिहासात ही सर्वात मोठी आणि भयानक घटना होती. अपहरणकर्त्या दहशतवाद्यांनी हे विमान अमृतसर, लाहोर, दुबई आणि शेवटी अफगाणिस्तानातील कंधार येथे गेले. त्याठिकाणी तालिबानीचं शासन होते.
काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावरून या विमानाने उड्डाण घेतले. त्यानंतर भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करताच दहशतवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर पायलटला सांगून हे विमान काबुलला नेले. लाहोरमध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या विमानाला लँडिंगची परवानगी देत तिथे इंधन भरले. त्यानंतर विमान दुबईला पोहचले. तिथे विमानातील २७ प्रवाशांचे मृतदेह उतरवले. २५ डिसेंबरला विमान कंधारला पोहचले. तिथे तालिबानच्या मध्यस्थीने हायजॅकर्सने त्यांच्या मागण्या ठेवल्या. ज्यात ३६ दहशतवाद्यांची सुटका, २०० मिलियन डॉलरचा समावेश होता. दीर्घ काळ चर्चेनंतर भारताने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ३ दहशतवादी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यात मसूद अजहरचा जो जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आहे, त्याच्यासोबत उमर सईद शेख, मुश्ताक अहमद जरगर याचा समावेश होता.
अब्दुल रौफ असगर हा १९९९ च्या कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड होता. मौलाना मसूद अजहरचा तो छोटा भाऊ होता. रौफने भावाला जेलमधून सोडण्यासाठी उल मुजाहिद्दीन आणि आयएसआयची मदत घेतली. भारताविरोधातील अनेक दहशतवादी कारवायात रौफचा हात होता. जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी कटात त्याचा सहभाग असायचा. तो भारतातील मॉस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. ज्याला ऑपरेशन सिंदूरमधून भारतीय सैन्याने ठार केले आहे.