मसूदच्या खानदानाचा केला खात्मा; म्हणतो, मी मेलो असतो तर बरे झाले असते
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 06:32 IST2025-05-08T06:31:54+5:302025-05-08T06:32:52+5:30
Operation Sindoor: मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. मसूद भारतातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक आहे.

मसूदच्या खानदानाचा केला खात्मा; म्हणतो, मी मेलो असतो तर बरे झाले असते
लाहोर : भारताने टार्गेट केलेल्या दहशतवादी ठिकाणांमध्ये जैश ए मोहम्मदचा गड असणाऱ्या पंजाबच्या बहावलपूर येथेही हल्ला करण्यात आला. याठिकाणी जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचे कुटुंब होते. या हल्ल्यात मसूदच्या कुटुंबातील १० जण आणि त्याच्या जवळच्या ४ जणांचा मृत्यू झाला. मसूदनेच हे कबूल केले आहे.
या हल्ल्यानंतर मसूद अजहरने म्हटले की, भारतीय हल्ल्यात माझ्या कुटुंबाचे १० सदस्य आणि ४ जवळचे सहकारी मारले गेले. या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते. मौलाना मसूद अजहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफ साहबचे पूर्ण कुटुंब, शहीद आणि मुफ्ती अब्दुल रऊफचे नातवंडे, बाजी सादियाचा पती आणि तिच्या मोठ्या मुलीचे ४ मुले जखमी झाले आहेत. हल्ल्यात अजहरचा एक जवळचा सहकारी, त्याची आई आणि इतर दोन जवळचे सहकारीही ठार झाले. महिला आणि मुले मारली गेली, असे जैश ए मोहम्मद संघटनेने म्हटले आहे.
कोण आहे मसूद अजहर?
मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. मसूद भारतातील सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक आहे. मसूद अजहर भारताच्या ताब्यात होता. मात्र १९९९ आयसी-८१४ या इंडियन एअरलाईन्सच्या हायजॅकनंतर बंधक नागरिकांच्या सुटकेसाठी त्याला सोडण्यात आले होते. त्यानंतर तो पाकिस्तान लपून भारतात अनेक दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता. त्यानंतर बहावलपूर हा जैशचा मुख्य अड्डा बनला होता.
प्रत्येक युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली
१९४७ (पहिले भारत-पाक युद्ध) : भारत व पाकिस्तानमध्ये काश्मीर प्रश्नावरून १९४७ साली पहिले युद्ध झाले. जम्मू-काश्मीर संस्थान कोणाच्या ताब्यात राहणार या मुद्द्यावरून हा संघर्ष सुरू झाला. पाकच्या मदतीने काश्मीरवर हल्ला झाला. महाराज हरीसिंह यांनी जम्मू-काश्मीरचे भारतात विलीनीकरण केल्यानंतर भारताने सैन्य पाठवले आणि पाकिस्तानविरोधात संपूर्ण युद्ध सुरू झाले. हे युद्ध पाकिस्तान हरला.
१९६५ (दुसरे भारत-पाक युद्ध) : ५ ऑगस्ट १९६५ रोजी काश्मीरवरून पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध भडकले. पाकिस्तानने ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ अंतर्गत हजारो सैनिकांना स्थानिक बंडखोरांच्या वेशात भारतात घुसवले. भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. सीमाभागात जोरदार लढाई झाली. पाकचा पराभव झाला.
१९७१ (बांगलादेश मुक्तिसंग्राम) : पूर्व पाकिस्तानमध्ये (आताचा बांगलादेश) पाकिस्तानी सैन्याच्या दडपशाहीमुळे आणि स्थानिकांच्या स्वातंत्र्याच्या मागणीमुळे १९७१ मध्ये युद्ध सुरू झाले. भारताने बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा दिला. पाकिस्तानने शरणागती पत्करली. बांगलादेश स्वतंत्र झाला.
१९९९ (कारगिल युद्ध) : मे ते जुलै १९९९ दरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या कारगिल भागातील उंच टेकड्यांवर पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी कब्जा केला. भारताने ‘ऑपरेशन विजय’ ही कारवाई करून तसेच शेकडो जवानांनी बलिदान देऊन हा भाग परत मिळविला.
२०१६ (सर्जिकल स्ट्राइक) : १८ सप्टेंबर २०१६ रोजी जम्मू-काश्मीरमधील उरी येथील भारतीय लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १९ जवान शहीद झाले. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात २८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने नियंत्रणरेषा पार करून सर्जिकल स्ट्राइक केला. या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.
२०१९ (एअर स्ट्राइक) : १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला, ज्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर २६ फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानात घुसुन जैशच्या प्रशिक्षण तळावर हल्ला केला.