बांगलादेशातलं ‘वन किडनी व्हिलेज’! आयुष्य बदलेल म्हणालेले... पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 07:25 IST2025-07-16T07:25:23+5:302025-07-16T07:25:37+5:30
साधारणपणे दर ३५ लोकांमागे एका व्यक्तीला फक्त एकच किडनी आहे. अर्थातच एकच निसर्गदत्त किडनी घेऊन ते जन्माला आलेले नाहीत...

बांगलादेशातलं ‘वन किडनी व्हिलेज’! आयुष्य बदलेल म्हणालेले... पण...
बांगलादेशच्या जॉयपूरहाट जिल्ह्यातील बाइगुनी हे एक छोटंसं गाव. हे गाव सध्या ‘वन किडनी व्हिलेज’ म्हणून प्रसिद्ध आहे. का? कारण या गावातील अनेक लोकांना एकच किडनी आहे. हे प्रमाण किती असावं? साधारणपणे दर ३५ लोकांमागे एका व्यक्तीला फक्त एकच किडनी आहे. अर्थातच एकच निसर्गदत्त किडनी घेऊन ते जन्माला आलेले नाहीत, तर त्यांनी आपली एक किडनी विकली आहे किंवा फसवणूक करून त्यांची एक किडनी काढली गेली आहे! यामागे आहे पैशांची अगतिकता, गरिबी, दारिद्र्य आणि तस्करांचं भलंमोठं रॅकेट!
४५ वर्षीय सफिरुद्दीन हा याच गावचा रहिवासी. गेल्यावर्षी अडीच लाख रुपयांना आपली एक किडनी त्याने विकली. बायकोच्या आजारपणासाठी त्याला पैसे हवे होते. आपल्या तीन मुलांसाठी घर बनवायचं होतं. किडनी विकल्यावर सगळं काही सुरळीत होईल असं त्याला वाटलं होतं; पण त्याच्या बायकोची प्रकृती अजूनही तोळामासाच आहे. बांधायला घेतलेलं घर अजून अर्धवटच आहे आणि स्वत: सफिरुद्दीन मात्र आजारपणाशी झुंजतो आहे. काम करण्यासाठी त्याच्यात ताकदच राहिलेली नाही.
सफिरुद्दीन म्हणतो, दलालानं मला सांगितलं होतं, सगळं काही अतिशय सोपं आहे. एक किडनी काढली म्हणून आयुष्यात काहीही फरक पडत नाही; पण त्यामुळे तुझं आयुष्य एकदम बदलून जाईल; पण तसं काहीच झालं नाही. उलट ऑपरेशननंतर माझा पासपोर्ट, औषधांची प्रिस्क्रिप्शन्स इतकंच काय, माझी सारी औषधंही गायब झाली!
याच गावची विधवा जोशना बेगम. पती वारल्यानंतर तिनं बेलालशी दुसरं लग्न केलं. २०१९ मध्ये तिनं आपली एक किडनी विकली. त्यावेळी या किडनीसाठी तिला सात लाख बांगलादेशी टका दिले जातील असं सांगितलं होतं; पण मिळाले फक्त तीन लाख टका. पैसे मिळाल्यानंतर तिचा दुसरा नवराही तिला सोडून निघून गेला. दलालानं तर तिला तिचा पासपोर्टही परत दिला नाही. जोशना म्हणते, माझ्याकडे आता औषधांसाठीही पैसे नाहीत. माझ्याच्यानं फारसं कामही होत नाही.
मोहम्मद सजल हा आणखी एक तरुण. २०२२ मध्ये त्यानं आठ लाख रुपयांना आपली किडनी विकली; पण आश्वासन दिल्याप्रमाणे आठ लाख रुपये त्याला मिळाले नाहीत, तेव्हा तो स्वत: ‘दलाल’ बनला आणि इतर बांगलादेशींसाठी दलाल म्हणून काम करू लागला! गावातल्या बहुसंख्य लोकांची हीच कहाणी. किडनी विकण्यापूर्वी दलालांकडून त्यांना भरमसाठ आश्वासनं दिली जातात, आता तुम्ही श्रीमंत व्हाल, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील; पण आजपर्यंत एकाही व्यक्तीला हा अनुभव आलेला नाही. ज्यांनी आपल्या किडन्या विकल्या, त्यात तिशीच्या वयोगटातले बहुसंख्य पुरुष आहेत.
बनावट ओळखपत्रे, नोटरी केलेली बनावट प्रमाणपत्रं, इतकंच काय, अगदी बनावट डीएनए अहवालही तयार केले जातात. त्यामुळे ज्या रुग्णालयांत या किडन्या काढल्या जातात, त्यांना संशय येत नाही किंवा बऱ्याचदा तेही जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करतात. गरजू रुग्णाला साधारणपणे १८ ते २२ लाखांना किडनी विकली जाते; पण विकणाऱ्याची मात्र केवळ अडीच ते चार लाख रुपयांत बोळवण केली जाते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातल्या बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे, किडनी विकण्यासाठी मुख्यत्वे आम्ही भारतात येतो!