पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये कधीही युद्धाची ठिणगी पडेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा तणावाच्या परिस्थितीत आज पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. लाहोर विमानतळावरआग लागली असून, या आगीमुळे सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पाकिस्तानच्या हवाई दलाचं एक विमान लाहोर विमानतळावर उतरत असताना टायरला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. तसेच ही घटना घडल्यानंतर ही धावपट्टी काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. तसेच येथील संपूर्ण व्यवस्थापनाचं नियंत्रण पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, लाहोरमधील अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर लागलेल्या आगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये विमानतळावर उपस्थित असलेले लोग धुरामुळे त्रस्त झालेले दिसत आहेत. तसेच आगीमुळे काळ्या धुराचे लोळ वर उठताना दिसत आहे. मात्र या आगीमध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही.