एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:59 IST2025-11-01T10:58:27+5:302025-11-01T10:59:14+5:30
गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तूफान युद्ध सुरू होते. मात्र, अनेक आठवड्यांच्या विध्वंसानंतर आता त्यांच्यात युद्धबंदी झाली आहे.

एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तूफान युद्ध सुरू होते. मात्र, अनेक आठवड्यांच्या विध्वंसानंतर आता त्यांच्यात युद्धबंदी झाली आहे. मात्र, या दरम्यानच आता अफगाणिस्ताननेपाकिस्तानला मोठा इशारा दिला आहे. या युद्धादरम्यान अफगाणिस्तानच्या शरणार्थींच्या अवस्थेवरून अफगाण सरकारने पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानचे इस्लामाबादस्थित राजदूत अहमद शाकिब यांनी पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अफगाण निर्वासितांच्या बिघडत्या परिस्थितीबद्दल इशारा दिला आहे. शाकिब यांनी पाकिस्तान सरकारला सर्व बॉर्डर क्रॉसिंग अर्थात तोरखम, चमन, बोल्दाक, अंगूर अड्डा आणि गुलाम खान त्वरित पुन्हा उघडण्याचे आवाहन केले.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे पाकिस्तान सरकारने कठोर निर्णय घेत अफगाणिस्तानसोबतच्या सर्व सीमा पार क्रॉसिंग तात्काळ बंद केल्या होत्या. या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील व्यापार, दळणवळण आणि नागरिकांची ये-जा पूर्णपणे थांबली आहे.
अफगाणिस्तानच्या दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अचानक बंदमुळे हजारो अफगाण निर्वासित अडकले आहेत. तसेच, पाकिस्तानमध्ये असलेल्या सुमारे १० हजार अफगाण निर्वासितांना ताब्यात घेऊन त्यांना विविध 'डिटेन्शन सेंटर'मध्ये पाठवण्यात आले आहे.
४०० हून अधिक ट्रक सीमेवर अडकले
अफगाणिस्तानच्या दूतावासाचे अधिकारी सरदार अहमद शकीब यांनी या स्थितीची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानातील या निर्णयामुळे विशेषत: पंजाब प्रांतातून आलेले निर्वासितांचे मोठे तांडे जामरोद-तोरखम रस्त्यावर अडकले आहेत. या तांड्यांमध्ये ४०० हून अधिक मोठे ट्रक आहेत आणि ट्रकमधील निर्वासितांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. हजारो निर्वासित अटकेच्या भीतीने बाहेर पडू शकत नाहीत, पण सीमा बंद असल्याने त्यांना मायदेशीही परत जाता येत नाहीये. शकीब यांनी पाकिस्तानी सरकारला तातडीने सर्व सीमा पार क्रॉसिंग पुन्हा उघडण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पाकिस्तानमधील काही अफगाण निर्वासितांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या गैरवर्तनाचीही निंदा केली आहे. अफगाणी पत्रकार झाहिर बहांद यांनी सांगितले की, अफगाण निर्वासित सध्या घरातच अडकले आहेत आणि बाहेर जाऊन साधे खाद्यपदार्थही विकत घेऊ शकत नाहीत. इतकेच नव्हे तर काही निर्वासितांना पाकिस्तानी पोलिसांच्या आदेशावरून त्यांच्या घरातून बेदखल करण्यात आले आहे.
तोरखम क्रॉसिंग फक्त निर्वासितांसाठी उघडणार
या सर्व परिस्थितीत, जनरल डायरेक्टरेट ऑफ बॉर्डर फोर्सेसचे प्रवक्ते अबीदुल्लाह फारुकी यांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानला परतणाऱ्या निर्वासित कुटुंबांसाठी तोरखम क्रॉसिंग आज पुन्हा उघडले जाईल. फारुकी यांनी स्पष्ट केले की, हे क्रॉसिंग केवळ मायदेशी परतण्याचा इरादा असलेल्या अफगाण कुटुंबांसाठीच खुले राहील. पुढील सूचना मिळेपर्यंत व्यावसायिक हालचाली आणि पादचारी वाहतूक मात्र दोन्ही बाजूंनी निलंबित राहील.
सध्या पाकिस्तान ज्या अफगाण कुटुंबांना हद्दपार करू इच्छितो, त्यांना खैबर पख्तूनख्वा प्रांतातील जामरोद येथील एका तात्पुरत्या शिबिरात ठेवण्यात आले आहे. इस्लामिक अमीरात आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये नुकत्याच झालेल्या संघर्षांमुळे तोरखम क्रॉसिंग बंद करण्यात आले होते.
युद्धविरामानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी म्हटले की, पाकिस्तान अफगाणिस्तानसोबत शत्रुत्व वाढवण्यास इच्छुक नाही, परंतु अफगाणिस्तानच्या तालिबान शासकांनी त्यांच्या सुरक्षा चिंतांचे निवारण करावे आणि अफगाण भूमीतून कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे.