ओमानचे सुलतान तब्बल २६ वर्षानंतर भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींशी गाझा मुद्द्यावर झाली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 17:30 IST2023-12-17T17:29:24+5:302023-12-17T17:30:42+5:30
सुमारे दहा प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्यावर झाली विशेष बैठक

ओमानचे सुलतान तब्बल २६ वर्षानंतर भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींशी गाझा मुद्द्यावर झाली चर्चा
Oman Sultan Haitham Bin Tarik Pm Modi : भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्यात शनिवारी नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यांच्या चर्चेदरम्यान, दोन्ही देशांच्या नेत्यांनी सुमारे दहा प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्यावर विशेष चर्चा केली आणि शक्य तितक्या लवकर व्यापार करार पूर्ण करण्यावर भर दिला. याशिवाय पीएम मोदी आणि सुलतान तारिक यांच्यात इस्रायल-हमास युद्धाबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. इस्रायल-हमास युद्धाच्या भीषणतेदरम्यान महत्त्वपूर्ण बैठकीत गाझामधील बिघडलेल्या परिस्थितीवर झालेली चर्चा महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.
बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा
पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिवांनी ही बैठक अतिशय व्यापक आणि रचनात्मक असल्याचे सांगितले. भारत आणि ओमानमधील द्विपक्षीय संबंधांबाबत, पारंपारिक क्षेत्रांव्यतिरिक्त, अनेक नवीन क्षेत्रांमध्येही सहमती आणि सहकार्याचा पाया घातला गेला. भारत-ओमान यांच्यात 'जॉइंट विजन: पार्टनरशिप फॉर फ्यूचर' यावर सहमती दर्शवण्यात आली. परराष्ट्र सचिव म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि ओमानच्या सुलतान यांनी सागरी क्षेत्र, कनेक्टिव्हिटी, हरित ऊर्जा उत्सर्जन, अवकाश, आरोग्य, पर्यटन आणि कृषी यासह अनेक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या दिशेने दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि सुलतान तारिक यांनी भारत-ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतही चर्चा केली.
सुलतान हैथम बिन तारिक हे आजपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. सुलतान हैथम बिन तारिक यांची ही पहिलीच भारत भेट आहे. पीएम मोदींनी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेत सुलतान तारिक यांचे जोरदार स्वागत केले आणि सांगितले की या बैठकीत दोन्ही देशांमधील संबंध अधिक सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावरून आगामी काळात द्विपक्षीय संबंधांची चौकट निश्चित होईल.
मोदी या बैठकीबाबत म्हणाले की, भारत-ओमान संबंधांसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. सुलतान 26 वर्षांनंतर भारताला भेट देत आहेत. अशा परिस्थितीत, मी भारतीय जनतेच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. भारत आणि ओमानचे संबंध हे धोरणात्मक भागीदारीचे आहेत आणि दोन देशांमधील द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध गेल्या काही वर्षांपासून वाढत आहेत.