अरे बापरे! सौदीच्या राजपुत्राने दोन दिवसांत गमावले तब्बल सात हजार 800 कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 16:47 IST2017-11-08T14:25:42+5:302017-11-08T16:47:40+5:30
सौदी अरेबियाचे राजपुत्र अल्वालीद बीन तलाल यांना भ्रष्टाचाराविरोधातील अभियानांतर्गत अटक करण्यात नुकतीच आली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर त्यांच्या एकूण संपत्तीला तब्बल 7 हजार 800 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

अरे बापरे! सौदीच्या राजपुत्राने दोन दिवसांत गमावले तब्बल सात हजार 800 कोटी रुपये
रियाध - सौदी अरेबियाचे राजपुत्र अल्वालीद बीन तलाल यांना भ्रष्टाचाराविरोधातील अभियानांतर्गत अटक करण्यात नुकतीच आली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर त्यांच्या एकूण संपत्तीला तब्बल 7 हजार 800 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तलाल यांच्या अटकेनंतर त्यांची कंपनी असलेल्या किंग्डम होल्डिंग कंपनीच्या (केएचसी) बाजारमुल्यामध्ये 1.2 अब्जा डॉलरची घट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कंपनीचे बाजारमूल्य 19 अब्ज डॉलरवरून 17.8 अब्ज डॉलरवर आले आहे.
सोमवारी शेअर बाजारांमध्ये केएचसीचा शेअर गेल्या सहा वर्षांमधील निचांकावर बंद झाला. 2013 सालच्या फोर्ब्सच्या प्रोफाइल नुसार अल्वालीद यांच्याकडे एक मार्बल फिल्ड, 420 खोल्यांचा रियाध पॅलेस, एक खाजगी बोईंग 747 आणि सौदी अरेबियाच्या राजधानीच्या किनाऱ्यावर 120 एकरमध्ये पसरलेला एक रिसॉर्ट आहे. या रिसॉर्चमध्ये पाच आलिशान बंगले, पाच कृत्रिम तलाव आणि एक छोटा ग्रँड कॅन्यन आहे.
केएचसीमध्ये अल्वालीद यांचे 95 टक्के शेअर आहेत. या हजारो कोटी रुपयांच्या भांडवलाखेरीज सौदी अरेबियातील त्यांची अन्य स्थावर संपत्ती, जगभरातील गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक, मध्य पूर्वेतून आलेली गुंतवणूक, विमान, यॉट आणि ज्वेलरी यांच्यासोबत अन्य संपत्तीचा समावेश आहे.
सौदी अरेबियात आजवरच्या सर्वात व्यापक भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत ११ राजपुत्र व डझनावारी आजी-माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली होती. अटक झालेल्यांमध्ये ट्विटर, अॅपल यासारख्या पाश्चात्य कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक असलेले अब्जाधीश राजपुत्र अल वालीद बिन तलाल यांचाही समावेश आहे. शक्तिशाली नॅशनल गार्डसचे प्रमुख, वित्तमंत्री व इतर बड्या पदाधिका-यांचीही हकालपट्टी करण्यात आली होती.
गेल्याच आठवड्यात सलमान यांच्या अध्यक्षतेखाली सौदी सम्राटांनी भ्रष्टाचारविरोधी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली होती. संशयितांनी देश सोडून पळून जाऊ नये, यासाठी त्यांची खासगी विमानेही जप्त करण्यात आली आहेत. सत्तेसाठी प्रमुख दावेदार समजले जाणारे सौदी नॅशनल गार्डचे प्रमुख मुतैब बिन अब्दुल्लाह यांनाही बरखास्त करण्यात आले आहे. नौदलाचे प्रमुख आणि आर्थिक विषयांचे मंत्री यांनाही हटविण्यात आले आहे. या घटनाक्रमाने देश हादरून गेला आहे. एका आदेशात म्हटले आहे की, भ्रष्टाचारविरोधी नव्या आयोगाच्या स्थापनेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या आयोगाचे प्रमुख वली अहद शहजादे (क्राउन प्रिंस) मोहम्मद बिन सलमान हे आहेत.