तेल सोडा..., आता सौदी 'या' गोष्टीच्या बळावर जगावर राज्य करणार, श्रीमंतीच्या बाबतीत स्वतःचाच विक्रम मोडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:22 IST2025-01-14T15:20:03+5:302025-01-14T15:22:00+5:30
हा सौदी अरेबियाचा एक मास्टर स्ट्रोक ठरू शकतो...

तेल सोडा..., आता सौदी 'या' गोष्टीच्या बळावर जगावर राज्य करणार, श्रीमंतीच्या बाबतीत स्वतःचाच विक्रम मोडणार
सौदी अरेबिया आता आणखी श्रीमंत होणार आहे. हा देश सध्या आपल्या तेल साठ्याच्या बळावर जगावर राज्य करत आहे. आता त्याने आणखी एक नवा खजिना खुला करण्याचे जाहीर केले आहे. तेलानंतर आता सौदी अरेबियाने युरेनियम समृद्ध करून विकण्याची घोषणा केली आहे. हा सौदी अरेबियाचा एक मास्टर स्ट्रोक ठरू शकतो.
संपूर्ण जगाला हवं आहे युरेनियम -
युरेनियमचा वापर अणुऊर्जा केंद्रांमध्ये इंधन म्हणून केला जातो. यामुळे त्याला जगभरात मोठी मागणी आहे. मात्र हा एक अत्यंत दुर्मिळ पदार्थ आहे. जो केवळ नैसर्गिक संसाधन म्हणूनच उपलब्ध आहे.
पेट्रोलियम उत्पादने एक दिवस संपुष्टात येणार, हे सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना माहित आहे. यामुळेच, ते आता कमाईचा मोठा स्रोत म्हणून युरेनियम खजिना आंतरराष्ट्रीय बाजारात विकक्रीसाठी आणण्याच्या तयारीत आहेत. महत्वाचे म्हणजे, या माध्यामाने, सौदी अरेबिया भविष्यातील आपले पेट्रोलियमवरील अवलंबित्व कमी करत आहे.
प्रिंस सलमान म्हणाले, येलो केक बनवणार -
सौदीचे ऊर्जा मंत्री प्रिंस अब्दुलअजीज बिन सलमान धाहरान येथे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, "आपण याला समृद्ध करू, विकू आणि 'येलो केक' बनवू". यावेळी त्यांनी, अणुभट्ट्यांसाठी यूरेनियम ईंधन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खनिजाच्या पावडर कॉन्सन्ट्रेटचा उल्लेख केला. यामुळे सौदी अरेबियाला केवळ गडगंज पैसाच मिळणार नाही, तर पेट्रोलियम साठे संपले, तरी त्यांच्या उत्पन्नावर अथवा अर्थव्यवस्थेवर फार परिणाम होणार नाही.
महत्वाचे म्हणजे, आखाती देशांमध्ये केवळ सौदी अरेबियामध्येच अणुऊर्जा प्रकल्प आहे. त्यांचा अणुकार्यक्रम अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे, परंतु सौदी अरेबियाची अण्वस्त्रांची महत्त्वाकांक्षा सर्वज्ञात आहे. यामुळे, सौदी अरेबिया युरेनियम समृद्ध करून आपला अणुकार्यक्रम वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.