आता रोबोच तयार करणार औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त रोबो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 07:02 IST2018-10-31T01:22:30+5:302018-10-31T07:02:16+5:30
चीनमधील सर्वांत मोठा प्रकल्प; आशियायी देशांतही करणार निर्यात

आता रोबोच तयार करणार औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त रोबो!
शांघाय : स्वीस बहुराष्ट्रीय कंपनी एबीबीकडून चीनमधील शांघाय येथे १५0 दशलक्ष डॉलर खर्चून एक भव्य प्रकल्प उभारण्यात येत असून, या प्रकल्पात रोबो बनविण्याचे काम रोबोकडूनच करून घेण्यात येणार आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी उपयुक्त रोबो बनविणारा चीनमधील हा सर्वांत मोठा प्रकल्प ठरणार आहे. एबीबी समूहाच्या चायना रोबोटिक कॅम्पसच्या जवळच हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प २0२0 च्या अखेरपर्यंत सुरू होईल. येथे चीनसाठी तसेच आशियात निर्यात करण्यासाठी रोबो बनविले जातील. चीन ही एबीबीची अमेरिकेनंतरची दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ आहे.
एबीबीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ७५ हजार चौरस फूट भूखंडावर उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पात मनुष्य आणि रोबो यांना एकत्रितरीत्या सुरक्षित काम करता येईल, असे सॉफ्टवेअर वापरण्यात येत आहे. कंपनीचे युमी नावाचे रोबो मनुष्यासोबत काम करण्यास सक्षम आहेत. रोबो तयार करण्यासाठी आवश्यक असलेले जुळणीचे (असेम्ब्ली) कामही युमी रोबो करू शकतात. एबीबी समूहाचे मुख्य कार्यकारी उलरिच स्पायशोफर यांनी सांगितले आहे की, ‘शांघाय हे एबीबी आणि जगासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानातील नेतृत्वाचे प्रमुख केंद्र बनले आहे.’ अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे चीनमधील इलेक्ट्रॉनिक्स, वाहनांचे सुटे भाग आणि अन्य उत्पादनाच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही उत्पादने उत्पादित करणाºया कारखान्यांत मोठ्या प्रमाणात रोबोचा वापर केला जातो. त्यामुळे रोबोच्या विक्रीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तरीही एबीबीने हा प्रकल्प उभारण्याची जोखीम उचलली
आहे. चिनी रोबोची विक्री या संकटावर मात करील, असा विश्वास एबीबीला वाटतो. त्यानुषंगाने कंपनीने आपले विस्तारकार्य हाती घेतले आहे.
उत्पादन खर्च होईल कमी
एबीबीच्या सूत्रांनी सांगितले की, चीनमधील कामगारांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे चीन आपली यांत्रिक श्रमशक्ती (रोबो वर्कफोर्स) वाढवीत आहे. कमी किमतीत माल विकणाऱ्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी उत्पादन खर्च कमी असणे आवश्यक आहे. त्यासाठी चीन व्यापक प्रमाणात आॅटोमेशन करीत आहे. २0१७ मधील आकडेवारीनुसार जगात विकल्या गेलेल्या प्रत्येक तीन रोबोपैकी एक रोबो चीनमध्ये गेला आहे. चीनने तब्बल १,३८,000 रोबो खरेदी केले आहेत.