आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 11:52 IST2025-07-26T11:51:31+5:302025-07-26T11:52:14+5:30
"पुढील वर्षाअखेरपर्यंत, AMAN (इस्रायलच्या लष्करी गुप्तचर संचालनालयाचे हिब्रू नाव) च्या सर्व कर्मचाऱ्यांकडून इस्लामचे अध्ययन करून घेतले जाईल. तसेच, ५० टक्के कर्मचाऱ्यांना अरबी भाषा शिकवली जाईल."

आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
इस्रायली डिफेंस फोर्सने (IMF) गुप्तचर विभागाच्या सैनिकांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी अरबी भाषा शिकणे आणि इस्लामच्या अभ्यासाचे ट्रेनिंग अनिवार्य केले आहे. अहवालानुसार, 7 ऑक्टोबर 2023 च्या घटनेसंदर्भात गुप्तचर विभागाला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे गुप्तचर अधिकाऱ्यांच्या तपासाची व्याप्ती आणखी वाढेल, असे मानले जात आहे.
पुढील वर्षाअखेरपर्यंत, AMAN (इस्रायलच्या लष्करी गुप्तचर संचालनालयाचे हिब्रू नाव) च्या सर्व कर्मचाऱ्यांकडून इस्लामचे अध्ययन करून घेतले जाईल. तसेच, ५० टक्के कर्मचाऱ्यांना अरबी भाषा शिकवली जाईल. AMAN प्रमुख मेजर जनरल श्लोमी बाइंडर यांनी हा आदेश जारी केला आहे.
अहवालानुसार, IDF च्या या कार्यक्रमात हुथी आणि इराकी बोलीभाषांवरही लक्ष केंद्रित केले जाईल. गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यांना सध्या हुथी समजून घेण्यात अडचण येत आहे. येमेन आणि इतर अरब प्रदेशातील बहुतेक लोकांना कात (एक सौम्य मादक वनस्पती) चघळण्याची सवय आहे. यामुळे स्पष्टपणे बोलण्यात अडचण येते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आर्मी रेडिओसोबत बोलताना म्हटले आहे की, "आपण आतापर्यंत संस्कृती, भाषा आणि इस्लामच्या क्षेत्रात सक्षम होऊ शकलो नाही. यात सुधारणा करणे आवश्यक आहे. आपण आपले गुप्तचर अधिकारी आणि सैनिक अरब गावांमध्ये वाढलेल्या मुलांप्रमाणे बनवू शकत नाही, मात्र भाषा आणि सांस्कृतिक अभ्यासाद्वारे त्यांची समज वाढवली जाऊ शकते."
शाळांमध्ये अरबी भाषेला प्रोत्साहन -
आर्मी रेडिओचे लष्करासंदर्भात प्रतिनिधी डोरोन कडोश म्हणाले, अरबी भाषा आणि इस्लामच्या शिक्षणासाठी एक नवा विभाग स्थापन केला जाईल. याशिवाय, आयडीएफने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये अरबीला प्रोत्साहन देण्यासाठी टेलेम विभाग पुन्हा सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे. यापूर्वी हा विभाग बजेटच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता. यामुळे अरबी शिकणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. आता गरज भासल्यास हा विभाग पुन्हा सुरू करण्याची तयारी आहे.