आता आकाशात दिसणार ‘मलाला’ नामक लघुग्रह
By Admin | Updated: April 13, 2015 04:16 IST2015-04-13T04:16:08+5:302015-04-13T04:16:08+5:30
मुलींच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या आणि नोबेल विजेत्या मलाला युसूफझाईचे नाव आता एका लघुग्रहाला देण्यात आले आहे. अमेरिकी

आता आकाशात दिसणार ‘मलाला’ नामक लघुग्रह
वॉशिंग्टन : मुलींच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या आणि नोबेल विजेत्या मलाला युसूफझाईचे नाव आता एका लघुग्रहाला देण्यात आले आहे. अमेरिकी अवकाश संशोधन संस्था नासाच्या नामकरणानंतर आता आकाशात मलाला नामक लघुग्रह पाहायला मिळणार आहे.
चार किलोमीटरचा व्यास असलेला हा लघुग्रह या नामकरणापूर्वी ‘३१६२०१’ नावाने ओळखला जात असे. मंगळ आणि गुरू या ग्रहांच्या पट्टात हा लघुग्रह आहे. सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यास यास साडेपाच वर्षांचा काळ लागतो. २०१० मध्ये नासाचे संशोधक एमी मेन्झर यांनी या लघुग्रहाचा शोध लावला होता. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेच्या नियमानुसार मेन्झर यांना लघुग्रहास नाव देण्याचा अधिकार आहे. तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हे पाऊल उचलले असल्याचे मेन्झर यांनी सांगितले. मानवतेसमोरील गुंतागुंतीच्या समस्यांची उकल करण्यासाठी सर्व प्रज्ञावंतांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. आम्ही अर्ध्या लोकसंख्येला त्यांचे हक्क नाकारू शकत नाही, असे मेन्झर म्हणाले.
मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या मलालावर आॅक्टोबर २०१२ मध्ये पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात दहशतवाद्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. यातून ती बालंबाल बचावली. (वृत्तसंस्था)