बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:59 IST2025-12-28T11:57:51+5:302025-12-28T11:59:08+5:30
'बांगलादेश माइनॉरिटी जनता पार्टी' आता आगामी निवडणुकीत हिंदूंचा प्रबळ आवाज बनून रिंगणात उतरणार आहे.

बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
बांगलादेशात सध्या हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समाजावर होणारे हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांच्यासारख्या तरुणांची जमावाने केलेली हत्या असो किंवा मंदिरांची विटंबना, या घटनांमुळे तिथला हिंदू समाज दहशतीखाली आहे. मात्र, आता याच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बांगलादेशच्या निवडणुकीत एका नव्या पक्षाने शड्डू ठोकला आहे. 'बांगलादेश माइनॉरिटी जनता पार्टी' आता आगामी निवडणुकीत हिंदूंचा प्रबळ आवाज बनून रिंगणात उतरणार आहे.
९१ जागांवर लढणार निवडणूक
येत्या फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर 'बीएमजेपी'ने ९१ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष सुकृती कुमार मंडल यांनी स्पष्ट केले की, ज्या मतदारसंघात हिंदू मतदारांची संख्या २० ते ६० टक्क्यांपर्यंत आहे, अशा जागांना त्यांनी प्राधान्य दिले आहे. ३०० पैकी ४० ते ४५ जागांवर विजय मिळवून संसदेत अल्पसंख्याकांचे प्रश्न मांडण्याचा या पक्षाचा निर्धार आहे.
भारत सरकारला मोठे आवाहन
सुकृती कुमार मंडल यांनी भारत सरकारलाही एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. "भारताने आता ढाकाबाबत आपले धोरण बदलण्याची गरज आहे. केवळ शेख हसीना यांच्या अवामी लीगला पाठिंबा देण्याऐवजी भारताने बांगलादेशातील हिंदूंच्या मुद्द्याला थेट पाठिंबा द्यावा," असे मंडल यांनी म्हटले आहे. भारताने भूमिका बदलली तर बांगलादेशातील इतर मुख्य प्रवाहातील पक्ष हिंदूंच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
BNP किंवा जमात-ए-इस्लामीसोबत युतीची तयारी?
सर्वात धक्कादायक म्हणजे, आपल्या समाजाच्या सुरक्षेसाठी हा पक्ष कोणत्याही मुख्य प्रवाहातील पक्षाशी हातमिळवणी करण्यास तयार आहे. मग ती तारिक रहमान यांची 'बीएनपी' असो किंवा 'जमात-ए-इस्लामी'. "जर या मोठ्या पक्षांसोबत आमची युती झाली, तर हिंदू मतदार कोणत्याही भीतीशिवाय घराबाहेर पडून मतदान करू शकतील," असे मंडल यांनी सांगितले. विशेष म्हणजे, त्यांनी अवामी लीगला आता आपल्या यादीतून पूर्णपणे वगळले आहे.
काय आहे या पक्षाचा अजेंडा?
'बीएमजेपी' पाच मुख्य मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहे:
- बांगलादेश खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष करणे.
- देशाचे ५ प्रांतांत विभाजन करून संघराज्य व्यवस्था लागू करणे.
- प्रत्येक प्रांताचे घटनात्मक अधिकार सुरक्षित करणे.
- पाठ्यपुस्तकात वैज्ञानिक आणि धर्मनिरपेक्ष विचारांचा समावेश करणे.
- अल्पसंख्याकांना समान हक्क आणि न्याय मिळवून देणे.
मंडल यांच्या मते, बांगलादेशात आजही सुमारे अडीच कोटी हिंदू राहतात. 'एनिमी प्रॉपर्टी ॲक्ट'सारख्या कायद्यांमुळे हिंदूंच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी हिंदूंनी राजकीय प्रवाहात सक्रिय होणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. आता ही नवी राजकीय शक्ती बांगलादेशच्या राजकारणाची दिशा बदलणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.