पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 08:23 IST2025-08-28T08:21:24+5:302025-08-28T08:23:05+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अद्याप तरी यश आलेले नाही.

पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
रशिया-युक्रेन युद्धावर अद्याप कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अद्याप तरी यश आलेले नाही. या संदर्भात त्यांनी अलास्कामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बैठकही केली. मात्र, परिस्थिती जैसे थेच आहे. यानंतर, आता ट्रम्प यांनी आपला राग झेलेन्स्कीवरच काढला आहे. त्यांनी युक्रेनला थेट धमकी दिली आहे.
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले युद्ध दोन्ही बाजूंनी होते. "यासाठी एकालाच दोषी ठरवणे चुकीचे आहे. दर आठवड्याला हजारो लोक आपले प्राण गमावत आहेत, त्यापैकी बहुतेक तरुण आहेत. जर त्यांना वाचवायचे असेल, तर मला निर्बंध लादावे लागतील. हे प्रकरण माझ्या पद्धतीने सोडवावे लागेल." तसेच, जर निर्बंध लादले गेले, तर ते रशिया आणि युक्रेन दोघांवरही जड जाईल, असेही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी दिली आर्थिक युद्धाची धमकी -
जर युद्ध थांबले नाही, तर आर्थिक युद्ध सुरू होऊ शकते, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ते म्हणाले, याचे गंभीर परिणाम दिसू शकतात. यामुळे जागतिक युद्ध होणार नाही, मात्र आर्थिक युद्ध निश्चितपणे होऊ शकते. हे अत्यंत वाईट ठरेल.
युद्ध रोखण्यासाठी होणार आणखी एक बैठक -
युक्रेन युद्ध राजनैतिक पातळीवर रोखण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात, याच आठवड्यात अमेरिका आणि युक्रेनच्या प्रतिनिधींमध्ये बैठकही होणार आहे. यासंदर्भात, ट्रम्प यांचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी फॉक्स न्यूजसोबत बोलताना, "आपण या आठवड्यात न्युयॉर्कमध्ये युक्रेनच्या प्रतिनिधींना भेटणार आहोत," असे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचे बरेच प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र हा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही.